एक ऑगस्ट ‘मराठी दिन’ म्हणून साजरा करावा – डॉ. श्रीमंत कोकाटे

पुणे (प्रतिनिधी) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे मराठी साहित्यातील योगदान पाहता एक ऑगस्ट हा दिवस मराठी दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी मातंग एकता आंदोलनच्या वतीने दहावी व बारावीच्या परिक्षमध्ये यश मिळविलेल्या गुणंवत विद्यार्थांचा सत्कार डॉ. कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, यादवराव सोनावणे, डॉ. सुहास नाईक, विठ्ठल गायकवाड, महिला आघडीच्या अध्यक्षा ऍड. राजश्री अडसूळ, सुरेखा खंडाळे, संजय साठे, दयानंद अडागळे, सुनील बावकर, हुसैन शेख, रोहित अवचीते उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. कोकाटे म्हणाले की, आपल्या जीवनातील संकटाला संधी बनवून जीवनाची वाटचाल करणारा लेखक अशी ओळख अण्णा भाऊ साठे यांची आहे. त्यामुळे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे मराठी साहित्य तील योगदान पाहता शासनाने तातडीनं मराठी दिनाचा निर्णय घ्यावा.
तर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनातून प्रेरणा घेऊन अनेक युवकांनी समाज कार्य केले पाहिजे. जीवनात कितीही कठीण प्रतिकूल परिस्थिती असली तरीही संघर्ष करून पुढे जाण्याचे सामर्थ्य अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनातून घ्यावे असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री बागवे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. कार्यकमाचे प्रास्ताविक विठ्ठल थोरात यांनी केले तर सूत्र संचालन अरुण गायकवाड यांनी केले.





