कराड (प्रतिनिधी) – येथील नेहरू चौकात असलेल्या जैन मंदिरात भरदिवसा चोरी झाली. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी मंदिरातील मंदिर व्यवस्थापकांच्या कार्यालयातील सुमारे दीड लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. मंदिराभोवती १६ कॅमेरे आहेत.
त्या कॅमेऱ्यांचा डिव्हीआरही चोरट्यांनी लंपास केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस पथकासही श्वान पथक व ठसे तज्ज्ञ तेथे माहिती घेत होते. व्यवस्थापक प्रकाश शहा यांनी पोलिसात त्याची माहिती दिली आहे. त्याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी घटनास्थळी खोलीची कसून तपासणी केली. मात्र, बाहेरील एकही वस्तू तेथे दिसली नाही. ठसे तज्ज्ञांनी ड्राव्हरसहीत दरवाजावरील ठसे घेतले आहेत. मंदिराला १६ कॅमेरे आहेत. त्याचा डिव्हीआर त्याच खोली असतो. तोही चोरट्यांने लंपास केला. त्यासोबत त्या खोलीतील एक लाख ५० हजारांची रोकडही लंपास झाली आहे.
पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अमीत बाबर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे.