फलटण -लॉकडाऊनच्या काळात मनोरंजनाची साधने बंद असताना आणि मुख्यमंत्र्यांनी चित्रिकरणास परवानगी दिल्यानंतर आपल्याच गावात एक ते दीड किलोमीटरच्या भागात चित्रिकरण केलेल्या साताऱ्यातील एका वेबसिरिजने पहिल्याच प्रयत्नात तब्बल दीड लाख हिट मिळवून या क्षेत्रातही आपला झेंडा फडकवला आहे. “गावची जत्रा कारभारी सतरा’ असे नाव असलेल्या या वेबसिरिजच्या निर्मितीचा सातारी फंडा चर्चेचा ठरला आहे. सातारा शहराचे उपनगर असलेल्या प्रतापसिंहनगर परिसरात राहणाऱ्या दोघा अवलिया कलाकारांनी अवघ्या चार जणांच्या मदतीने ग्रामीण भागातील दररोजच्या जीवनातील अनेक प्रसंगातून खुमासदार कॉमेडी साकारत या वेबसिरिजमध्ये रंगत आणली आहे. या वेबसिरिजने आठवडयात लाखभर हिट मिळवून वेबसिरिजच्या दुनियेत खळबळ उडवून दिली. प्रवीण भंगुरे वेबसिरिजचे शुटींग, संकलन सोबत, दिग्दर्शनही करतो. त्याचा मित्र पृथ्वीराज लांडगे या वेबसिरिजचे लेखन करतो. “गावची जत्रा कारभारी सतरा’ वेबसिरीजची निर्मिती त्या दोघांनी मिळून केली आहे. प्रवीणने यापूर्वी अनेक चित्रपटांचे व शॉर्टफिल्मचे शुटिंग व एडिटिंग अशी कामे केली आहेत. त्याला जोड मिळाली पृथ्वीराज लांडगे या कलाकार मित्राची. ग्रामीण भाषेवरील प्रभुत्व असलेला पृथ्वीराज या वेबसिरीजमध्ये लेखक आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे पृथ्वीराज याने तुंबाड, बघतोस काय मुजरा कर, सातारचा सलमान अशा चित्रपटात तसेच जाहिराती व शॉर्टफिल्ममध्ये काम केले आहे. वेबसिरिजच्या संगीताची बाजू आनंद चव्हाण याने सांभाळली आहे. या वेबसिरीजचे चित्रिकरणही प्रतापसिंहनगर, खेड परिसरातच केले आहे. विशेष म्हणजे अत्यंत तुटपुंज्या साधनसामग्रीवर त्यांनी निर्माण केलेल्या वेबसिरिजची त्यांनी कुठेही कसलीही प्रसिध्दी केलेली नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या टीमकडून समाजप्रबोधनाचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे. कामाला समाजातून मिळत असलेली मान्यता या संपूर्ण टीमचे मनोधैर्य वाढवणारी आहे. “गावची जत्रा कारभारी सतरा’ ची चित्तरकथा साकारणाऱ्या आदित्या गायकवाड, निखिल कांबळे, सोनाली ओंबळे, ऋतुजा मोहिते, जितेंद्र मगरे, प्रवीण साळवे आणि चेतन मगरे हे कलाकार असून सहाय्यक दिग्दर्शकाचे काम चेतन मगरे सांभाळत आहे.