दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अँक्शन मोडवर आले आहेत. विधानसभा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रधान सचिवांची बैठक घेत त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आगामी शंभर दिवसात राज्य शासनाचा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर राज्यामध्ये दीड लाख नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. सर्व यंत्रणा या तांत्रिक दृष्ट्या सक्षम करून लोकांना कशाप्रकारे चांगली सेवा देता येईल, याचा विचार करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
प्रशासकीय कामांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला सेवा देण्यासाठी राज्यात शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश देखील फडणवीस यांनी दिले आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची ही पहिलीच संयुक्त बैठक होती. यामध्ये राज्याच्या धोरणाचे नेतृत्व हे अधिकारीच करतील, असे देखील फडणवीस यांनी सांगितले. याच बरोबर पारदर्शक, प्रामाणिक आणि गतिशील काम करण्याचा सल्ला देखील फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
दिल्लीतही वॉर रूम –
केंद्र सरकारशी संबंधीत कामाची गती वाढवण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे यंत्रणा निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. या माध्यमातून राज्य सरकारचे दिल्लीतील कामे गतिशील होतील. त्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश
– प्रत्येक विभागांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम सादर करावा
– दीड लाख नवीन कर्मचारी भरती करण्याचे आदेश
– आपले सरकार पोर्टल नव्याने पूर्ण क्षमतेने सुरू करावे
– दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून स्वतंत्र कक्ष उभा करावा
– तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून अडचणी दूर कराव्यात
– सर्व सरकारी पार्टल, संकेतस्थळे हे आरटीआय फ्रेंडली करावेत
– तातडीने सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून पदस्थापना करावी





