जिल्ह्यात साडेचार लाख बालकांचे होणार लसीकरण

19 जानेवारीपासून पल्स पोलिओ मोहिमेला सुरुवात !
आरोग्य विभागाची जनजागृती
नगर (प्रतिनिधी) – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 4 लाख 41 हजार 115 बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहेत. ही मोहीम 19 जानेवारीपासून जिल्ह्यात प्रारंभ केली जाणार आहे. लसीकरणापासून कुठलेही बालके वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृतीला प्रारंभ करण्यात आला आहे. 19 जानेवारी पासून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना ही लस दिली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी ग्रामीण भागात केंद्रे असून, शहरी भागातही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या पथकामार्फत ही लस देण्यात येणार आहे.

ग्रामीण व शहरी भागात 21 जानेवारी ते 23 जानेवारी व 25 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या दरम्यान घरोघरी जाऊन मुलांना लस देण्यात येणार आहे एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये असे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती मिळाली.
याशिवाय मिशन इंद्रधनुष्य मोहिमेपासून वंचित राहिलेल्या बालकांना व मातांसाठी येत्या 6 जानेवारीपासून मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेचे देखिल तयारी करण्यात येत आहे. मिशन इंद्र धनुष्य मोहिमेपासून डीएचओ अंतर्गत येणारी 838 बालले तर शहरी भागातील 96 बालके वंचित आहेत. शिवाय ग्रामीण भागातील मिशन इंद्र धनुष्यच्या लाभापासून वंचित राहिलेल्या मातांची संख्या 116 एवढी आहे. तर शहरी भागातील मातांची संख्या 11 असून मनपा हद्दीतील 1 माता इंद्र धनुष्य पासून वंचित आहे.
इंद्र धनुष्य मोहिमेसाठी डीचओ अंतर्गत 228 सत्र घेतले जाणार, शहरी भागात 20 तर मनपा हद्दीतील 11 सत्रे राबवली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. लसीकरण मोहीम आणि इंद्रधनुष्य मोहिमेसाठी आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांचा या मोहिमेत सहभाग असणार आहे.





