‘मिळाले दीड कोटी अन्‌ सांगताहेत सतराशे कोटी’

‘राष्ट्रवादी’च्या आरोपांवर महापौर, सत्तारुढ पक्षनेत्यांचे उत्तर

पिंपरी – शहरातील करोनाबाधित रुग्णांसाठी महापालिकेने जवळपास 150 कोटींचा निधी खर्च केला आहे. मात्र, राज्य शासनाकडून आतापर्यंत दीड कोटी रुपयांचाच निधी महापालिकेला मिळाला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सतराशे कोटी रुपये मिळाल्याचे सांगितले जात आहे. करोना काळात नागरिकांची दिशाभूल केल्याचा पलटवार महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके यांनी केला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे दोन दिवसांपूर्वी शहरामध्ये आले होते, तेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना मित्रत्वाच्या नात्याने कोविड काळात पुणे व पिंपरी चिंचवड शहराला जास्तीत जास्त वेळ देऊन आपली जबाबदारी पार पाडावी असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी राज्य शासनाकडून 1700 कोटींना मंजुरी मिळाल्याचे सांगत चंद्रकांत पाटील राजकीय हेतुने आरोप करतात, असा टोला लगावला होता.

वाघेरे यांना उत्तर देताना महापौर ढोरे आणि सत्तारुढ पक्षनेते ढाके यांनी सांगितले की, कोविड काळात शासनाने दिलेले 33 टक्‍के निधीच वापरण्याचे निर्देश काढले. राज्य शासनावर कुठलाही भार न देण्याच्या अटीस अधीन राहून राज्य शासनाचे वित्त विभागाकडून पाणीपुरवठा, ड्रेनज, रस्ते आदीच्या विकास कामांसाठी 1700 कोटी रुपये स्वायत्ता मंजूर केली आहे.

परंतु हा 1700 कोटीचा निधी पालिकेला कोविड उपाययोजनांसाठी मिळाल्याचा खोटा गवगवा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी सुरु केला आहे. मात्र कोविड उपाययोजनेसाठी फक्त 1.5 कोटी रुपये मिळाले असून 1700 कोटी कसे व कुठून आले, याची माहिती देखील राष्ट्रवादी घेणे अपेक्षित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.