लोणी काळभोर -पूर्व हवेलीतील थेऊर मंडल कार्यालयांतर्गत येत असलेल्या 5 गावांतील तब्बल 678 जण आज उत्तर प्रदेशातील आपल्या गावी निघाले. त्यांना दौंड रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आपण आपल्या मूळ गावी पोहोचणार असल्याचे समजल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वहात होता. मंडल अधिकारी गौरी तेलंग यांनी दिलेल्या माहितीनुसार करोनामुळे पूर्व हवेलीत विविध ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना वाहने मिळत नसल्याने घरी कसे पोहचायचे, या प्रश्नाने त्यांना ग्रासले होते. महाराष्ट्र सरकारने परप्रांतीयांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे व इतर वाहनांची सोय केल्यामुळे महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या सर्व परप्रांतीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पुणे जिल्हा अधिकारी व हवेली तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशानुसर महसूल प्रशासनाने घरी परतण्यासाठी इच्छुक असणाऱ्या परप्रांतीय कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांची आवश्यक ती सर्व माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवली होती. त्यानुसार थेऊर मंडल कार्यालयातून 1 हजार 71 जणांची यादी पाठविण्यात आली होती; परंतु यामधील काहीजण यापूर्वीच मिळेल त्या वाहनांनी घरी परतले होते. काहींना येथेच रोजगार मिळाल्याने त्यांनी गावी जाणे टाळले. उत्तर प्रदेश सरकारने या उर्वरित नागरिकांना घराकडे परतण्याची परवानगी दिली. त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार आज सकाळी थेऊर मंडल अधिकारी गौरी तेलंग, तलाठी दादासाहेब झंजे (लोणी काळभोर), दिलीप पलांडे (थेऊर), मिलिंद शेट्टी (मांजरी बुद्रुक), योगिराज कनिचे (आळंदी म्हातोबाची) यांनी दिलेल्या सुचनेनुसार 678 उत्तर प्रदेशातील कामगार आपल्या कुटुंबियांसमवेत प्रत्येक गावात ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहचले. लोणी काळभोर – 148, कदमवाकवस्ती – 94, थेऊर व कुंजीरवाडी 158 आणि मांजरी बुद्रुक – 278 असे उत्तर प्रदेशीय नागरिक परत गेले असून, त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकत्यांनी 1 हजार जेवणाच्या पाकिटांचे तर तलाठी दादासाहेब झंजे यांनी बिस्कीट पुड्यांचे वाटप केले. त्यानंतर सर्वांना पीएमपीएमएलच्या 35 बसमधून दौंड रेल्वे स्थानकावर नेण्यात आले. तेथून रात्री 10 च्या सुमारास विशेष श्रमिक रेल्वेने ते आपल्या मूळ निघाले. उत्तर प्रदेशात पोहोचण्यासाठी त्यांना 24 तासांचा कालावधी लागणार आहे.