घराबाहेर नागरिक पडत नसल्याने सर्वत्र वर्दळ कमी
कात्रज – जगभरामध्ये करोना व्हायरसच्या संसर्गाने थैमान घातलेले असतानाच त्याची झळ पुणे शहरातील काही भागांमध्ये देखील जाणवत आहे.
नागरिक शक्यतो घराबाहेर पडत नसल्याने रस्त्यावरील वाहनांची वर्दळही कमी झाली असून काही भागात शुकशुकाट जाणवत आहे. यातून बाजारातील उलाढाल मंदावल्याने व्यापारी वर्गही चिंतेमध्ये आहे.
कात्रज, धनकवडी, बालाजी नगर, सहकार नगर, कोंढवा-येवलेवाडी या परिसरातील मनपा व खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली आहे. करोना व्हायरसच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी. यासंदर्भात मुख्याध्यापक शिक्षक व अधिकारी वर्ग यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
पुणे मनपाच्या आरोग्य विभागाकडून मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना व्हिसी रूमद्वारे व्हर्च्युअल क्लासरूम अंतर्गत सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे, प्रकल्प अधिकारी मीनाक्षी राऊत यांनी विद्यार्थ्यांना करोना व्हायरसच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे किंवा शिंकताना रूमालाचा वापर करणे, अशा अनेक गोष्टी व्हर्च्युअल क्लासरुम मार्फत सांगण्यात आल्याचे शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर यांनी सांगितले. पुणे मनपा आरोग्य विभागामार्फत मनपा शाळांमध्ये साबण व हॅन्डवॉश मोफत देण्यात येणार आहे.
या करोना व्हायरसच्या वातावरणामुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. यामुळे खासगी व मनपा शाळांमधून विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.