सौरदिव्यांचा दुसऱ्याच दिवशी “अंधार

दिवे बंद : ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, जिल्हा परिषद सदस्यांची मागणी

पुणे – “कृषी विभागाने लावलेले सौर दिवे दुसऱ्याच दिवशी बंद पडतात. ज्या एजन्सीकडे हे काम आहे, त्यांनी जिल्हा परिषदेला वेळोवेळी फसवले आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य बसवून आपल्याकडूनच पैसा उकळत असून, असा एजन्सीला ब्लॅक लिस्ट करण्याऐवजी पाठीशी घालून वेळोवेळी त्यालाच कॉन्ट्रॅक्‍ट दिले जाते, असे का?’ असा प्रश्‍न जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर कृषी सभापतींनी थेट “या एजन्सीला कॉन्ट्रॅक्‍ट देण्यास माझा विरोध होता’ असे सांगताच कृषी अधिकाऱ्यांची सदस्यांनी पोलखोल केली.

जिल्ह्यात सौर दिवे बसविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला जिल्हा नियोजन समितीकडून निधी देण्यात आला. त्यानुसार 2018-19 मध्ये सौर दिव्यांचे कॉन्ट्रॅक्‍ट एका एजन्सीला देण्यात आले. मात्र, एजन्सीची मागील सर्व्हिस रेकॉर्ड पाहता या एजन्सीला कॉन्ट्रॅक्‍ट द्यायचे नाही, असे सभापतींनी कृषी अधिकाऱ्यांना सुचविले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी परस्पर या एजन्सीची नेमणूक करून त्यांना काम दिले. त्यानंतर आचारसंहितेमुळे मार्च महिन्यात सौर दिवे बसविता आले नाही. आता सौर दिवे बसविण्यास सुरवात झाली असून, दिवा बसवून दोन दिवसही झाले नाही की, तो बंद पडला अशी तक्रार सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केली.

यावेळी भाजप गटनेते शरद बुट्टे म्हणाले, “ज्या एजन्सीकडून जिल्हा परिषदेला वेळोवेळी फसविले जाते, त्याच एजन्सीला परत कामे का दिली जातात. सभापतींनी नकार देऊनही त्याच एजन्सीला कॉन्ट्रॅक्‍ट देणे म्हणजे अधिकारी नक्की कोणासाठी काम करतात. ही जिल्हा परिषद नक्की क्‍लार्क चालवतात, की पदाधिकारी? असा जाब विचारत संबधित ठेकेदाराचे बिल द्यायचे नाही अशी तंबीही बुट्टेपाटील यांनी दिली.

रणजित शिवतरे म्हणाले, “काही महिन्यांपूर्वीच या एजन्सीला ब्लॅक लिस्टमध्ये टाका असे सांगितले होते, तरीही कारवाई झाली नाही. त्या एजन्सीचा ठेकेदार काय जावई आहे का?’ त्याच्यावर तत्काळ कारवाई करा.
तर, “ज्या ठिकाणचे सौर दिवे लागणार नाहीत ते सगळे इथे आणून टाकेल,’ असा इशारा सदस्य विठ्ठल आवाळे यांनी दिला.

सौर दिव्यांबाबतच्या तक्रारी माझ्याकडे द्या, त्यावर ठोस पावले उचलण्यात येतील. अधिकाऱ्यांनी तात्काळ याबाबत पाहणी करून, ज्या ठिकाणी दिवे बंद असतील ते सुरू करावेत. तोपर्यंत एजन्सीचे बिल काढू नये. याची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा.

विश्‍वासराव देवकाते, अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.