देऊळगावराजे : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील आलेगाव देऊळगावराजे, पेडगाव, शिरापूर आदी गावांच्या नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे केबल ऑटो स्टार्टर कृषीपंपाची तार चोरी करण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. यावर पोलीस प्रशासनाकडून चोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागील आठवड्यामध्ये देऊळगावराजे येथील बंधार्यालगत असलेल्या 17 शेतकऱ्यांचे केबल चोरीला गेले होते. याबाबतची तक्रार देऊळगावराजे येथील शेतकरी हरी ज्ञानदेव अवचर यांनी दौंड पोलीस स्टेशनला दिली आहे. दौंड पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे. चोरांच्या सुळसुळाटामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे पोलिसांनी याचा छडा लावून चोरट्यांना बेड्या ठोकण्यात याव्या; अन्यथा यापुढेही चोरटे शिरजोर होतील, अशी भीती नदीकाठच्या गावांतून व्यक्त होत आहे. केबल, स्टार्टर, ऑटो कृषीपंप चोरी करीत राहतील, प्रतिक्रिया शेतकरी रोहन गिरमकर यांनी दिली.