प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 28 -गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आल्याने शहरात बाजारपेठामंध्ये रविवारी खरेदीसाठी झुंबड उडाली. पावसाची उघडीप, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि आठवड्याचा सुट्टीचा दिवस हा दुर्मीळ योग गणेशभक्तांनी खरेदीच्या सार्थकी लावला.
शहरात मंडई, तुळशीबाग परिसरात शहर आणि उपनगरांतून नागरिक खरेदीसाठी आल्याने बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने मखरे, सजावट साहित्य, रोषणाईची उपकरणे आदींच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
गणेशोत्सवासाठी काही दिवस शिल्लक असल्याने नागरिकांनी बाप्पाच्या आरासासाठी मखर खरेदी करताना दिसले तर काहींनी सजावटीसाठी रंगीबेरंगी कृत्रिम फुलांचे हार, माळा, प्रिंटेड कापड, सजावटीच्या वस्तू खरेदी केल्या.
लाडक्या बाप्पासाठी आभूषणे खरेदी करण्यासाठी तुळशीबागेतील इमिटेशन ज्वेलरी दुकानात गर्दी केली होती. महिलांनी गौरीचे मुखवटे आणि त्यांच्यासाठी लागणारे आभूषणे खरेदीसाठी गर्दी केली होती. तर रोषणासाठी लाइटिंगच्या माळा रंगीबेरंगी फोकस, विविध लाइटिंग खरेदी करताना दिसून आले. दरम्यान, गणेशभक्त सहकुटुंब खरेदीसाठी आल्याने बाजारपेठामध्ये गर्दी झाली होती. बरेच नागरिक खरेदीसाठी मोटारी घेऊन बाजारात दाखल झाल्याने प्रमुख रस्त्यांबरोबरच गल्ली-बोळांतही वाहतुकीची कोंडी झाली. मंडई परिसरात वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता तसेच मध्यभागातील गल्लीबोळांमध्येही वाहनांचा खोळंबा झाल्याचे चित्र होते. मंडई परिसरातील वाहनतळावर मोटारी लावण्यास जागाच नसल्याने अनेकांनी नदीपात्रातील रस्त्यावर वाहने उभी केली, तर दुचाकी लावण्यासाठी वाहनतळावर लाइन लागली होती. बाजारपेठा बरोबरच सदाशिव पेठ, नारायण पेठेतील गल्ली बोळात बेशिस्तपणे दुचाकी लावण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली.