कोलकाता : पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता सरकारविरुद्ध जोरदार आघाडी उघडली आहे. येणाऱ्या रामनवमीनिमित्त बंगालमध्ये किमान एक कोटी हिंदू सुमारे दोन हजार रॅलींमध्ये सहभागी होतील असे त्यांनी जाहीर केले आहे. तथापि, या २००० रॅलींचे आयोजन करणाऱ्या लोकांनी प्रशासनाची परवानगी घेऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील त्यांच्या मतदारसंघातील नंदीग्राम येथे एका कार्यक्रमात बोलताना, अधिकारी यांनी राम नवमीच्या आयोजकांना रॅली काढण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेऊ नये असे आवाहन केले. कारण आम्हाला भगवान रामाची प्रार्थना करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी, सुमारे ५०,००० हिंदूंनी रामनवमीच्या रॅलींमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी एक हजार रॅली काढण्यात आल्या होत्या. मात्र या वर्षी, ६ एप्रिल रोजी राज्यभरात किमान १ कोटी हिंदू २००० रॅली काढण्यासाठी रस्त्यावर उतरतील, असे ते म्हणाले. सुवेंदु हे प. बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. कोणत्याही समुदायाचे नाव न घेता ते म्हणाले, आम्ही शांत राहू. परंतु इतरांनीही शांतता राखावी हे प्रशासनाचे काम आहे. दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सुजन चक्रवर्ती म्हणाले की, पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते अधिकारी हिंदू धर्माचे रक्षक नाहीत. पश्चिम बंगालमध्ये राम नवमी हा हिंदूंसाठी कधीही सामूहिक उत्सव नव्हता. फक्त भाजप आणि तृणमूल काँग्रेसनेच राज्यात राम नवमीला इतका मोठा उत्सव म्हटले आहे. कोणत्याही उत्सवात सहभागी होणे किंवा न होणे हे व्यक्तीवर अवलंबून असते.