पिंपरी | लाडकी बहिणसाठी शेवटच्या दिवशी ३३०० महिलांनी केले अर्ज

पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ ऑक्टोबर पर्यंत वाढवून दिली होती. शेवटच्या मुदतीपर्यंत शहरातून ३ हजार ३०० महिलांनी अर्ज केला आहे.
मात्र विधान सभा निवडणुकीची आचारसंहिता लागु झाल्यामुळे अचानक पोर्टल बंद केल्यामुळे अनेक बहिणींचे ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.
योजनेतील महिलांच्या खात्यात तिसऱ्या हफ्त्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक महिलांना काही कारणामुळे अर्ज दाखल केले नव्हते.
अशा महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी शासनाने १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली.
मात्र, केवळ अंगणवाडी सेविकांमार्फत भरलेले अर्जच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्विकारण्यात येत असल्याने शहरातील ३०० अंगणवाड्यामध्ये अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली होती.
दुसरीकडे या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने अशा महिलांनी अंगणवाडी केंद्रावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
शेकडो महिलांना अर्जापासून वंचित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना १ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. त्यासाठी हजारो महिला पुन्हा अर्ज सूरू होण्याची वाट पाहत होत्या. शुक्रवारी सायंकाळी अर्जाची लिंक सुरू केली.
तीन-चार दिवस लिंक सुरु असल्याने अर्ज भरण्यात आले. सकाळपासून महिला अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी केंद्रावर जाऊन रांगेत थांबलेल्या होत्या.
पण मंगळवारी दुपारी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आणि निवडणुकीची आचारसंहिता लागु झाल्यामुळे लिंक बंद करण्यात आल्यामुळे शेकडो महिलांना अर्ज करण्यापासून वंचित रहावे लागले.





