Stock Market: नवीन वर्ष २०२६ च्या पहिल्याच व्यापारी सत्रात भारतीय शेअर बाजारात संमिश्र कल पाहायला मिळाला. जागतिक बाजारातील सुस्तीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी आज जरी सपाट पातळीवर बंद झाले असले, तरी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मात्र १ लाख कोटी रुपयांहून अधिक भर पडली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने जगातील अनेक प्रमुख बाजार बंद असल्याचा परिणाम भारतीय बाजारातील व्यवहारांवर दिसून आला, ज्यामुळे ट्रेडिंगमध्ये काहीशी सुस्ती जाणवली. दिवसभर बाजारात चढ-उतार सुरू होते, मात्र व्यवहारांचा वेग मंदावल्याने निफ्टी ऑटो आणि एफएमसीजी वगळता इतर बहुतांश क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मोठी हालचाल झाली नाही. आजच्या व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३२ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ८५,१८८.६० वर बंद झाला, तर निफ्टी-५० निर्देशांक १६.९५ अंकांच्या वाढीसह २६,१४६.५५ वर स्थिरावला. जरी निर्देशांकात मोठी वाढ दिसली नसली तरी, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलाने झेप घेतली आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी बाजार भांडवल ४,७५,७९,२३८ कोटी रुपये होते, जे आज वाढून ४,७६,८८,०७२ कोटी रुपयांवर पोहोचले. यामुळे वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १,०८,८३३ कोटी रुपयांची भर पडली आहे. सेंसेक्समधील ३० पैकी २२ शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्ये प्रामुख्याने एनटीपीसी, झोमॅटोची ‘एटर्नल’ आणि एम अँड एम या कंपन्यांचे शेअर्स आघाडीवर होते, तर आयटीसी, बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी ऑटोमध्ये आज १ टक्क्यांची वाढ दिसली, तर निफ्टी एफएमसीजीमध्ये मात्र ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. बीएसईवर आज एकूण ४,३३५ शेअर्समध्ये व्यवहार झाले, ज्यापैकी २,२११ शेअर्स वधारले तर १,९५२ शेअर्समध्ये घसरण झाली. विशेष म्हणजे, आजच्या सत्रात १४४ शेअर्सनी वर्षभरातील सर्वोच्च स्तर गाठला, तर ८७ शेअर्स नीचांकी पातळीवर आले. यासोबतच १० शेअर्सनी अप्पर सर्किटला गवसणी घातली. बाजारातील या संमिश्र वातावरणामुळे गुंतवणूकदारांसाठी २०२६ ची सुरुवात सकारात्मक मानली जात आहे.