ढाका: संपूर्ण जगाला वेठीस धरणारा कोरोना बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मात्र पथ्यावर पडला आहे. कोरोनाचा फैलाव विचारात घेऊन झिया यांची तुरुंगातून सुटका करण्याची प्रक्रिया बांगलादेश सरकारने सुरू केली आहे. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी (बीएनपी) या त्या देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या सर्वेसर्वा असणाऱ्या 74 वर्षीय झिया सध्या तुरुंगात आहेत. भ्रष्टाचाराशी संबंधित दोन प्रकरणांत त्यांना 17 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे फेब्रुवारी 2018 पासून त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले आहे. आता करोनाचे संकट विचारात घेऊन झिया यांची सुटका करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली. ती मागणी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने मान्य केली आहे. आता झिया यांच्या वयाचा विचार करून त्यांची सशर्त सुटका केली जाणार आहे. त्यामुळे झिया किमान सहा महिने तुरुंगाबाहेर राहू शकतील, असे समजते. बांगलादेशात काही करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे तेथील सरकारने करोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून त्या देशात दहा दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.