23 जूनला ठरणार फुरसुंगी-लोहगावचा “मिनी आमदार’

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांची धावपळ सुरू


11 गावांचा एकच प्रभाग असल्याने उमेदवारांची होणार दमछाक

– महादेव जाधव

फुरसुंगी – पुणे महापालिकेमध्ये शहरालगतच्या 11 गावांचा समावेश होऊन दीड वर्षे उलटली असून या भागाला लोकप्रतिनिधी मिळावा यासाठी या गावांमध्ये निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

फुरसुंगी-लोहगाव प्रभाग क्र.42 ची निर्मिती करून प्रभागरचना, मतदारयादीही जाहीर झाल्याने या गावांमध्ये येत्या 23 जूनला निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. ही निवडणूक नगरसेवकपदासाठी असली तरी निवडून येणारा उमेदवार हा “मिनी आमदार’च होणार आहे. कारण, 11 गावांचा एकच प्रभाग, दोनच नगरसेवक, 2 लाख 39 हजार लोकसंख्या व 1,79,000 मतदार, सुमारे 25-30 किलोमीटरचा हा प्रभाग असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्याचे व खर्च करण्याचे इच्छुकांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

फुरसुंगी-लोहगाव प्रभाग क्र.42ची निर्मिती करून अंतिम प्रभागरचना, मतदारयादी व 23 जून मतदान व 24 जूनला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या 11 गावांमधून “प्रथम नगरसेवक’नव्हे तर “मिनी आमदार’ होण्यासाठी इच्छुकांची संख्या व मोर्चेबांधणी वेगाने सुरू झाली आहे. या 11 गावांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे चांगले प्राबल्य असले तरी भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेसनेही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर, मनसेही आपली ताकद आजमावू शकते. त्यातच भर म्हणजे भाजप-शिवसेना युती व कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा निर्णय काय होणार तोपर्यंत कोणाचेच काही खरे दिसत नाही. युती-आघाडी झाल्यास अनेक इच्छुकांची तिकिटे कापली जाणार असल्याने इच्छूक “गॅस’वर आहेत. तर, मोठ्या प्रमाणात होणारी बंडखोरी रोखण्याचे आव्हान सर्वच पक्षांपुढे राहणार आहे. कारण, अनेकजण अपक्ष निवडणूक लढवून आपणाला निवडून येता नाही आले तरी चालेल; परंतु एखाद्याला पाडुन आपला विजय साजरा करणार असल्याची परिसरात चर्चा आहे.

महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्र.42 मध्ये सर्वच राजकीय पक्षात तिकीटासाठी मोठी स्पर्धा निर्माण झालेली दिसत आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने त्यांकडून विविध कार्यक्रम, आंदोलने, मोर्चे काढुन जनतेचे व पक्षश्रेष्ठींचे लक्षवेधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.काही इच्छुकांमध्ये संभ्रम व द्विधा स्थिती निर्माण झाली आहे. अनेकजण या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्या ऐनवेळी घेणार हे निश्‍चित आहे. तर काहीजण “वेट ऍन्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत.तर काही राजकीय पक्षांना तुल्यबळ उमेदवारही मिळविणे कठीण जाणार आहे.

महापालिकेत जाण्यासाठी अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधुन प्रभागातील मतदारांना आकर्षीत करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून स्वत:चा किंवा पक्ष नेत्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पैठणी वाटप, लकी ड्रॉ, होम मिनिस्टर, मेळावे, विविध क्रीडा स्पर्धा, स्नेहभोजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत वाढु लागली आहे. मात्र, कोणत्याही इच्छुकांनी मतदारांना गृहीत धरण्याची चुक करू नये, कारण मतदार जागरुक व सुज्ञ झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या भागातील उमेदवारालाच मतदान होऊ शकते. आपल्या गावातील उमेदवार नसेल तर त्या गावांतून मतदानाची टक्‍केवारी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कमी होऊ शकते.

फुरसुंगी-लोहगाव प्रभाग क्र.42 मध्ये फुरसुंगी, उरुळी देवाची, उंड्री,लोहगाव, केशवनगर, साडेसतरानळी, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, धायरी, शिवणे, नऱ्हे या 11 गावांचा मिळून हा प्रभाग तयार झाला आहे. भौगोलिकदृष्ट्या हा प्रभाग 25-30 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा असल्याने व यामध्येही सलगता नसल्याने सर्व भागांत पोहोचण्यासाठी उमेदवारांची मोठी दमछक होणार आहे. तर, पैसाही प्रचंड खर्च करावा लागणार असल्याने “वजनदार’ कार्यकर्त्यालाच प्रत्येक पक्षाचे तिकीट जावू शकते. त्यामुळे या प्रभागात साम -दाम-दंड-भेद या नीतीचा वापर करून निवडून येण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत; तर काही इच्छूक मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना व प्रलोभने दाखवत आहेत. गायब असणारे अनेक अनोळखी चेहरे फ्लेक्‍सवर झळकू लागले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पैशाचा पाऊस पडणार मात्र धनशक्‍तीचा विजय होणार की जनशक्‍तीचा हे सुज्ञ मतदारांच्याच हाती आहे.

तीन गावांतून मिळून पहिला नगरसेवक
या प्रभागात फुरसुंगी, ऊंड्री व उरुळी देवाची ही गावे शेजारी-शेजारी असल्याने व सर्वच पक्षातील नेते, कार्यकर्ते व नागरिक एकमेकांना परीचित असून नातीगोती जवळची आहेत. या तीन गावांचे मिळून 60 हजार इतके मतदार आहेत. त्यामुळे या तीन गावांतून मिळून पहिला नगरसेवक नव्हे मीनी आमदार निवडून येवू शकतो. परंतु, त्यासाठी तिकीट मिळालेल्या उमेदवाराचे काम करताना पक्षभेद वा गटतट न पाळता जवळचा माणूस म्हणून एक जीवाने काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुल्यबळ, जनमत असणारा व विकासाची दृष्टी असणारा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे धनदांडगा असणे गरजेचे आहे. तर निवडून येण्यासाठी काहीही अडचण येणार नाही. या तीन गावांत व एकूण प्रभागांत राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे चांगलेच प्राबल्य असून या दोन पक्षातच लढत होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.