प्रभात वृत्तसेवा पुणे – खत कंपन्या शेतकऱ्यांना खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने विक्री करीत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होते. अशा प्रकारे विभागातील जिल्ह्यातील खत कंपन्या सक्तीने विक्री करीत असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे. शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची गुण नियंत्रण निरीक्षकांमार्फत शहानिशा करून तक्रारीत दोषी आढळून आलेल्या घाऊक किरकोळ विक्रेते यांच्याविरुद्ध निलंबन अथवा रद्दची कारवाई करण्यात येईल. तसेच, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ चे कलम ३ नुसार पोलीस केस दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल. याची नोंद घेऊन कृषी सेवा केंद्र चालकाने विक्रीसाठी इतर उत्पादनाची सक्ती करू नये, असेही विभागीय कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.