पुणे : स्वराज्याची तोरण ठरलेल्या किल्ले तोरणा आणि राजधानी किल्ले रायगड यांच्या दरम्यान वसलेल्या आठरा गाव मावळ परिसरातील वाड्या वस्त्यांमध्ये यंदा दिवाळीचा गोडवा वाढला. पुण्यातील ‘दुर्गम प्रतिष्ठान’च्या वतीने वेल्हे तालुक्यातील आठरा गाव मावळ परिसरातील पिशवी, गुगुळशी, पांगारी, वरोती, केळद येथील आर्थिक, सामाजिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबाना देण्यात आलेल्या दिवाळी भेटीने ग्रामस्थ गहिवरले. दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी, शहरवासीयांप्रमाणे त्यांनाही हा दिपोत्सव उत्साहाने साजरा करता यावा, या उद्देशाने पुण्यातील ‘दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेच्या वतीने रविवारी (ता. १२ ) संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार जाधव, कार्याध्यक्ष डॉ. प्रसाद खंडागळे यांच्या नेतृत्त्वाखाली हा उपक्रम साजरा करण्यात आला. गावातील ५० कुटुंबांना साखर, तेल, पोहे, रवा, बेसनपीठ, गव्हाचे पीठ, तूप, कडधान्य, डाळी, साबण, चहा पावडर, मसाले आदी महिनाभर पुरेल अशा किराणा मालासह दिवाळी फराळ, ब्लॅंकेट, कानटोपी, आकाश कंदील, बिस्किटे, सुगंधी तेल, साबण, पणती, उटणे, रांगोळी आदी जीवनावश्यक ६३ वस्तूंसह चारशे वह्या शालेय साहित्याचे वाटप करण्यात केले. यावेळी देण्यात आलेल्या सौर कंदिलामुळे या वाड्या उजळून निघणार आहेत. गावातील ७२ महिलांना साड्या, ६६ मुलामुलींना, तसेच १२ ज्येष्ठ नागरिक, ७३ पुरुषांना नवीन कपडेही देण्यात आले. गावात पोचताच गावकऱ्यांनी पारंपरिक वाद्यांच्या निनादात मिरवणुक काढून सर्वांचे स्वागत केले. पुणेकरांच्या स्वागतासाठी पानाफुलांच्या मदतीने स्वागत कमान उभारली. गावात पोचताच सर्वांचे औक्षण करण्यात आले. घरोघरी रांगोळ्या काढून आकाश कंदील लावण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर गावतील आजी-आजोबा, जेष्ठ नागरिकांचे औक्षण करण्यात आले. ‘दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेचे स्वाती सेठ, श्रीकांत मोरे, रविंद्र पठारे, अॅड. प्रमोद पवार, कविता शिंदे, माधवी येलारपूरकर, निलेश जांभळे, गणेश काळे, अमोल कुटे, संजय ऐलवाड, सुनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमासाठी रवि जाधव, श्रीप्रसाद गिरी, राजूशेठ गिरे, नितीन शहा, राहूल जाधव, संतोष कस्पटे, प्रविण तांबेकर, अशोक जाधव, उल्हास कदम, श्रींमत घाडगे, विनोद येलारपुरकर, विशाल नाळे, सुरेश ढमढेरे, राकेश मुगळे, जावेद शेख, विवेक कोबल, त्याच बरोबर महिला प्रतिनिधी रश्मी जाधव, सुनंदा मोरे, अपर्णा शेठ, नीलम खंडागळे, भारती थोरवे, लता कोंढाळकर, स्वाती वाडेकर, मोनाली अवसरे, ऐश्वर्या जांभळे, विद्या लबडे, मधुरा कुलकर्णी यांच्यासह सखी ग्रुप, आधार ग्रुप, मेडिवन मेडिकल्स या संस्थांनी विशेष सहकार्य केले.