Manjar Movie Teaser: ओंकार भोजनेचं मोठ्या पडद्यावर कमबॅक! ‘मांजर’चा भन्नाट टीझर रिलीज, मित्रांच्या गोंधळाची रंगणार मजेशीर कहाणी
Manjar Movie Teaser ‘मांजर’ या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. पोस्टरमध्ये अस्ताव्यस्त घर, बिनधास्त मित्रांची गँग आणि त्यांचं निवांत आयुष्य पाहायला मिळालं होतं. त्यामुळे चित्रपटाच्या नावामागे नेमकं काय दडलं आहे, याची उत्सुकता निर्माण झाली होती. आता टीझरमधून या चित्रपटाची थोडीशी झलक समोर आली आहे.

Manjar Movie Teaser: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता ओंकार भोजने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्याच्या आगामी मराठी चित्रपट ‘मांजर’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. चित्रपटात ओंकार भोजनेसह सिद्धार्थ मेनन, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘मांजर’ या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. पोस्टरमध्ये अस्ताव्यस्त घर, बिनधास्त मित्रांची गँग आणि त्यांचं निवांत आयुष्य पाहायला मिळालं होतं. त्यामुळे चित्रपटाच्या नावामागे नेमकं काय दडलं आहे, याची उत्सुकता निर्माण झाली होती. आता टीझरमधून या चित्रपटाची थोडीशी झलक समोर आली आहे.
चार मित्र आणि त्यांच्या आयुष्यातला भन्नाट गोंधळ
टीझरमध्ये सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये ही चार प्रमुख पात्रं दिसतात. या चौघांचे स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व वेगवेगळे आहेत. मात्र, एकत्र आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात सुरू होणारी धमाल पाहायला मिळते.
तीन मित्रांचं मोकळंढाकळं आयुष्य सुरू असताना त्यांच्या जगात काही अनपेक्षित घटना घडताना दिसतात. त्यातून निर्माण होणारा गोंधळ आणि धावपळ टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. पात्रांमधील संवाद, त्यांची केमिस्ट्री आणि मजेशीर प्रसंग पाहता ‘मांजर’ हा मनोरंजनाचा तडका देणारा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
मांजराचा आवाज वाढवतोय उत्सुकता
या टीझरमधील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे त्याच्या शेवटी ऐकू येणारा मांजराचा आवाज. चित्रपटाचं नाव ‘मांजर’ असल्यामुळे या आवाजाकडे प्रेक्षकांचं विशेष लक्ष गेलं आहे. या मांजराचा कथेशी नेमका काय संबंध आहे, हे मात्र निर्मात्यांनी गुलदस्त्यात ठेवलं आहे.
अभिनेता सिद्धार्थ मेनननेही चित्रपटाबद्दल बोलताना तीन मित्रांचं मोकळं विश्व आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मजेशीर परिस्थितीवर भाष्य केलं आहे. मांजर त्यांच्या जगाचा आधीपासूनच एक भाग असल्याचं त्याने सांगितलं. मात्र, त्याच्याभोवती घडणाऱ्या घटनांमुळे या मित्रांच्या आयुष्यात अनेक गमतीदार प्रसंग निर्माण होतात.
अनेक कलाकारांची मांदियाळी
‘मांजर’मध्ये केवळ चार प्रमुख कलाकार नाहीत, तर अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. सयाजी शिंदे, अंशुमन विचारे, वैष्णवी आंधळे आणि अश्विनी काळसेकर यांचीही झलक टीझरमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे हा चित्रपट मल्टिस्टारर ठरणार आहे.
चित्रपटाचं दिग्दर्शन सुशील महादेव यांनी केलं आहे. टीझरमधून चित्रपटात विनोद, मैत्री, गोंधळ आणि काही अनपेक्षित घटना यांचा मेळ पाहायला मिळणार असल्याचं दिसतं.
विशेष म्हणजे, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ओंकार भोजनेच्या मोठ्या पडद्यावरील कमबॅककडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे ‘मांजर’च्या टीझरनंतर आता चित्रपट कधी प्रदर्शित होतो आणि मांजराचा कथेत नेमका काय रोल आहे, याची उत्सुकता वाढली आहे.





