“नेव्ही अधिकाऱ्याच्या ‘त्या’ पत्नीला, वडील गमावलेल्या चिमुरड्यांना मी काय उत्तर देऊ?” ; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला विधानसभेत भावुक

Omar Abdullah on Pahalgam Attack । पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरुद्ध मांडण्यात आलेल्या ठरावाच्या समर्थनार्थ जम्मू आणि काश्मीर विधानसभेत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भाषण दिले. यावेळी त्यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व लोकांची नावेही घेत अत्यंत भावुक झाले.
यावेळी ओमर अब्दुल्ला यांनी, “मला विश्वास बसत नाही की काही दिवसांपूर्वी आपण या सभागृहात उपस्थित होतो, अर्थसंकल्प आणि इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. जम्मू आणि काश्मीरमध्ये अशी परिस्थिती उद्भवेल की आपल्याला या वातावरणात पुन्हा येथे भेटावे लागेल असे कोणी विचारले असेल. पहलगाम हल्ल्यानंतर जेव्हा मंत्र्यांची बैठक झाली तेव्हा आम्ही राज्यपालांना एक दिवसाचे अधिवेशन बोलावण्याची विनंती करू असा निर्णय घेण्यात आला.” ओमर अब्दुल्ला विधानसभेत भावुक होत, “या हल्ल्याने आपल्याला आतून पोकळ केले आहे. त्या नेव्ही अधिकाऱ्याच्या विधवेला, त्याच्या वडिलांना रक्ताने माखलेले पाहणाऱ्या त्या लहान मुलाला मी काय उत्तर देऊ?” असे भावोद्गार काढले.
‘२६ वर्षांत पहिल्यांदाच…’ Omar Abdullah on Pahalgam Attack ।
सभागृहत बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी, “जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर २६ वर्षांत पहिल्यांदाच मी लोकांना अशा प्रकारे बाहेर येताना पाहिले. लोक कठुआपासून श्रीनगरपर्यंत बाहेर आले आणि उघडपणे म्हणाले की काश्मिरींना हे हल्ले नको आहेत. Not in My name…… प्रत्येक काश्मिरी हे म्हणत आहे.”असे त्यांनी म्हटले.
#WATCH | Jammu: J&K CM Omar Abdullah says, “Militancy and terrorism will end when people will support us. This is the beginning of that… We should not say or show anything which harms this movement that has arisen… We can control militancy using guns, it will end only when… pic.twitter.com/cWmsUY9uQL
— ANI (@ANI) April 28, 2025
‘ना संसदेचे ना या देशाचे…’
ओमर अब्दुल्ला म्हणाले, “पहलगाममधील २६ लोकांचे दुःख जम्मू-काश्मीर विधानसभेइतके संसद किंवा या देशातील इतर कोणत्याही विधानसभेला समजत नाही. तुमच्या समोर बसलेल्या लोकांनी त्यांचे जवळचे नातेवाईक गमावले आहेत. काहींनी त्यांचे वडील गमावले आहेत, तर काहींनी त्यांचे काका गमावले आहेत. आपल्यापैकी किती जणांवर हल्ला झाला आहे? आपले इतके सहकारी आहेत ज्यांच्यावर इतक्या वेळा हल्ला झाला आहे की आपण त्यांची गणना करून थकून जाऊ. ऑक्टोबर २००१ मध्ये श्रीनगर हल्ल्यात ४० जणांनी आपले प्राण गमावले. म्हणूनच पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या लोकांचे दुःख या विधानसभेपेक्षा जास्त कोणीही समजू शकत नाही.”असे त्यांनी यावेळी सांगितले.
‘माफी मागण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत…’ Omar Abdullah on Pahalgam Attack ।
पुढे ओमर अब्दुल्ला यांनी, “यापूर्वी आपण काश्मिरी पंडित आणि शीख समुदायांवर दहशतवादी हल्ले पाहिले आहेत. असा हल्ला बऱ्याच काळानंतर झाला आहे. पीडितांच्या कुटुंबीयांची माफी मागण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रभारी नाही, परंतु मी पर्यटकांना काश्मीरला भेट देण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यांचे यजमान म्हणून, त्यांची काळजी घेणे आणि त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. पर्यटकांची माफी मागण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.” असे त्यांनी म्हटले . तसेच यावेळी त्यांनी,” काही दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नौदल अधिकाऱ्याच्या विधवेला मी काय बोलावे? त्यांना सांत्वन देण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पीडितांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी मला विचारले की त्यांचा गुन्हा काय आहे? माझ्याकडे उत्तर नव्हते. असे म्हणत ओमर अब्दुल्ला अत्यंत भावनिक झाल्याचे दिसले.





