उमर अब्दुल्ला यांनी मोदींकडे सोपवला ठराव; जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याची मागणी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी गुरूवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सध्या केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करण्यात यावा या मागणीचा ठराव उमर यांनी मोदींकडे सादर केला.
मुख्यमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर उमर यांनी पहिल्यांदाच देशाच्या राजधानीचा दौरा केला. त्यांनी मोदींशी सुमारे अर्धा तास जम्मू-काश्मीरशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. त्यामध्ये प्रामुख्याने सुरक्षा स्थिती आणि विकासकामांचा समावेश होता. जम्मू-काश्मीरमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स, कॉंग्रेसचा समावेश असणाऱ्या इंडिया आघाडीने बाजी मारली. त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. त्याद्वारे जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याची मागणी केंद्र सरकारला करण्यात आली. त्या दर्जाचा मुद्दा प्रचारावेळी गाजला. आता केंद्र सरकारच्या पाऊलाकडे जम्मू-काश्मीरचे लक्ष असेल.





