Olympiad competition: विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या निसर्ग मित्र ऑलिम्पियाड स्पर्धेचा बहुप्रतिक्षित निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. हा निकाल ERCJPP या यू ट्यूब वाहिनीच्या माध्यमातून प्रसारित केला गेला असून सर्व सहभागी विद्यार्थी आणि पालकांना तो पाहता आला. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये ज्ञान प्रबोधिनी – शैक्षणिक साधन केंद्र , प्रबोधिनीचा माजी विद्यार्थी संघ (पर्यावरण विशेष उद्दिष्ट गट) आणि इकॉलॉजिकल सोसायटी, पुणे यांच्या एकत्रित सहकार्याने शालेय विद्यार्थ्यासाठी ‘निसर्ग मित्र ऑलिंपियाड’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हे या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल आवड निर्माण करून पर्यावरणपूरक दृष्टीकोन विकसित करणे आणि ज्ञान प्रबोधिनीची प्रकल्पाधारित शिक्षण पद्धती सर्व स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. Olympiad competition: या कार्यक्रमासाठी ओइकोसच्या संस्थापक केतकी घाटे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. परीक्षकांपैकी इकॉलॉजिकल सोसायटीचे अजय फाटक सर यांनी मनोगत व्यक्त केले. CSR Partner मर्स्क ग्लोबल सर्व्हिस सेंटर, इंडिया असून त्यांचे प्रतिनिधीत्व कविता साप्रा यांनी केले. PTC Software India ही संस्था CSR Outreach Partner असून कनिषा रैना यांनी त्यांचे प्रतिनिधित्व केले. एकूण बक्षिसांच्या रक्कमेसाठी प्रबोध अर्थसंचय यांनी अर्थसहाय्य केलेले आहे. स्पर्धेच्या प्रमुख मार्गदर्शक शिक्षणतज्ज्ञ डॉ. नलिनीताई गुजराथी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन इकॉलॉजिकल सोसायटीच्या पारुल घुगे यांनी केले. यावर्षी १३ राज्यातील १०१८१ विद्यार्थी १०० पेक्षा अधिक शाळातून सहभागी होते. अंतिम फेरीत निवडलेल्या ३०० विद्यार्थ्याच्या मुलाखती घेऊन ५४ प्रकल्पांना पदके आणि २३ उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर करण्यात आली. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, जम्मू काश्मीर, माणिपूर या ५ राज्यातील आणि महाराष्ट्रातील पुणे, सिंधुदुर्ग, लातूर, रायगड, सोलापूर, ठाणे, संभाजीनगर, कोल्हापूर, धारशिव, जळगाव, अंबाजोगाई, बीड, मुंबई या १३ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाली. तसेच बक्षीस मिळू न शकलेल्या उल्लेखनीय प्रकल्पांना Token of Appreciation जाहीर करण्यात आले. मिडल स्कूल ब्रार, बंदीपुरा, (जम्मू-काश्मीर), ओझा शंकर विद्यालय,खारसोम, मणीपुर या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सीमावर्ती राज्यांसाठी असलेला पुरस्कार मिळवला. उत्कृष्ट प्रकल्प मार्गदर्शक म्हणून श्रद्धा जोशी, हेमांगिनी पुराणिक ,ओंकार जोशी आणि ऋतूजा कोलते यांना पुरस्कार देण्यात आला. रंजना देसाई (मार्गदर्शक-मणीपुर येथील शाळा ),अवंती बाचिम (न्यू इंग्लिश स्कूल,टिळक रोड), सुषमा केणी (विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल, कसाल, सिंधुदुर्ग), माधवी हांडेफाफले (न्यू इंग्लिश स्कूल,चांदखेड) यांना निसर्ग मित्र प्रेरणा पुरस्कार देण्यात आला. Olympiad competition: अधिकाधिक विद्यार्थी सहभागी झाल्याबद्दल न्यू इंग्लिश स्कूल,टिळक रोड, न्यू इंग्लिश स्कूल,चांदखेड, रेनिसान्स इंटरनॅशनल स्कूल,लातूर, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे यांना आणि विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल,कसाल, सिंधुदुर्ग या शाळेला उत्कृष्ट प्रकल्पांच्या सादरीकरणासाठी गुणात्मक पारितोषिक जाहीर करण्यात आले. तसेच न्यू इंग्लिश स्कूल चांदखेड, ग्रामप्रबोधिनी साळुंब्रे, दिशा पब्लिक स्कूल,वाई या शाळांना अधिक प्रकल्प सादर केल्याबद्दल आणि संस्थात्मक सहभागासाठी शिक्षण प्रसारक मंडळ, मराठवाडा आणि पू. शंकर काणे विद्यालय, मणीपुर यांना पुरस्कार देण्यात आला.