पोलिसांनी परवानगी नाकारली, जरांगे पाटील म्हणतात…

Manoj Jarange Patil in Mumbai | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांसह आज लोणावळा येथे पोहोचले आहेत. मुंबई येथील आझाद मैदानावर जरांगे यांचे आंदोलन नियोजित आहे. मात्र पोलिसांनी जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली असल्याचं समोर आलं आहे.
एकीकडे जरांगे लोणावळ्यात पोहोचले असतानाच, दुसरीकडे आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याने पुढं काय होणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच आता स्वतः
मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ? | Manoj Jarange Patil in Mumbai
लोणावळ्याहून मुंबईकडे कूच करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याबाबत विचारले असता, पोलिसांनी आझाद मैदानाच्या एका बाजूला आंदोलनास परवानगी दिली असून येथे स्टेज उभारण्याचे काम सुरु असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
याबाबत आपल्याला मराठा कार्यकर्त्यांनी नुकतीच माहिती दिली असल्याचे देखील ते म्हणाले.
परवानगीवरून संभ्रम | Manoj Jarange Patil in Mumbai
दरम्यान, आझाद मैदानाचा आकार आंदोलन करण्याइतपत मोठा नसल्याचं कारण देत मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील व त्यांच्या समर्थक आंदोलनकर्त्यांना परवानगी नाकारली असल्याचं वृत्त आहे.
अशातच जरांगे पाटील यांनी मात्र परवानगी मिळाली असल्याचं बोलल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
आझाद मैदानावर जाणारच | Manoj Jarange Patil in Mumbai
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना, आपण आझाद मैदानावर जाणार असल्याचं स्पष्ट केलं. पोलिसांनी परवानगी नाकारल्यास काय अशी विचारणा पत्रकारांनी केल्यानंतर, आझाद मैदानावर आंदोलनाबाबत आपण ठाम असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
पोलिसांनी सुचवलं पर्यायी मैदान
आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांनी आझाद मैदान येथील परवानगी नाकारली आहे. मैदान छोटं असून आंदोलनासाठी योग्य नसल्याचं पोलिसांनी म्हंटल आहे. मुंबई पोलीस यांनी या आंदोलनासाठी खारघर येथील मैदान सुचवले असल्याचं वृत्त आहे.




