खड्डे बुजविण्याच्या कामाकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
कात्रज – पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज घाटातील जुना बोगदा रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून सर्वत्र खड्डे पडले आहेत. या मार्गावर नवा बोगदा तयार झाल्यानंतर जुन्या बोगदा रस्त्याचा वापर कमी होईल, असे सांगितले जात होते. परंतु, शहराच्या दक्षिणेकडील भागाकडे येणारी वाहने याच मार्गाचा वापर करीत आहेत.
कात्रज परिसरात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे कात्रज चौक ते बोगद्यापर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावर दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कात्रज घाट रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाणही अधिक असून बोगद्याजवळ मोठ मोठे खड्डे आहेत. यातून अपघात होत असल्याने या मार्गावरील खड्डे त्वरीत बुजवण्यात यावेत, अशी मागणी चालक तसेच नागरिकांतून होत आहे.
लॉकडाउनच्या काळात पुणे-सातारा महामार्गावरील कात्रज ते जुना बोगदा रस्ता दुरूस्तीचे काम होणे गरजेचे होते; परंतु या काळात महामार्गावर वाहतूक नसताना सुध्दा संबंधित विभागांनी या कामाकडे दुर्लक्ष केले आहे.
काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली होती. परंतु, ही कामे देखील निकृष्ट दर्जाची झाली आहेत. पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रात्री-अपरात्री खड्डे दिसत नसल्याने एखादे वाहन यामध्ये आदळून दरीत कोसळण्याचा मोठा धोका आहे. त्युामळे या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी होत आहे.