ऐन सणासुदीत तेल महागणार; आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली – देशभरात सध्या गणेशोत्सवाची धुम सुरू असून त्यानंतर नवरात्र उत्सव आणि दिवाळी सण साजरी होणार आहे. अशात केंद्र सरकारने खाद्य तेलांच्या आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात तेल महागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.
नवरात्रात नऊ दिवसांचे उपवास असतात. दिवाळीत फराळ तयार केला जातो. या सगळ्यासाठी खाद्य तेल वापरले जाते. ऐन सणासुदीच्या काळात खाद्य तेलांच्या किंमती वाढणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
सरकारने क्रूड, रिफाइंड सनफ्लॉवर ऑईल आणि अन्य खाद्य तेलांवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आयात शुल्कात २० टक्के वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाकडून एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार क्रुड आणि रिफाइंड पाम तेल, सोयाबीन तेल आणि सनफ्लॉवर सीड तेल आदीवर बेसिक कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे.
क्रुड पाम ऑइल, क्रूड सोयाबीन तेल आणि क्रुड सनफ्लॉवर सीड ऑइलवर बेसिक कस्टम ड्युटीचे दर आत्तापर्यंत शून्य होती. म्हणजेच या तेलांवरील आयात शुल्क लागत नव्हते. आता हेच आयात शुल्क वाढून २० टक्के करण्यात आले आहे. तर, रिफाइंड सनफ्लॉवर सीड ऑइल, रिफाइंड पाम ऑइल, रिफाइंड सोयाबीन तेलांवर बेसिक ड्युटीचे दर वाढवून ३२.५ टक्के करण्यात आले आहे. हा बदल सप्टेंबर महिन्यातच होणार आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या दरात तेजी येणार असल्याचे मानले जात आहे.
अशी आहे वाढ
कस्टम ड्युटी वाढवल्यानंतर क्रूड पाम ऑइल, क्रूड सोयाबीन तेल आणि क्रूड सनफ्लॉवर सीड ऑइलवरील प्रभावी शुल्क दर आता ५.५ टक्क्यांनी वाढून २७.५ टक्के होणार आहे. तसेच रिफाइंड सनफ्लॉवर सीड ऑइल, रिफाइंड पाम ऑइल आणि रिफाइंड सोयाबीन तेलावरचे प्रभावी शुल्क आता १३.७५ टक्क्यांवरुन आता ३५.७५ टक्के इतकी होणार आहे.





