Oil Prices Surge: इराणची संघर्ष करण्याची क्षमता संपुष्टात येईपर्यंत अमेरिका इराणवर हल्ले करणार आहे. हे हल्ले दोन ते तीन आठवडे चालण्याची शक्यता आहे असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर खनिज तेलाचे दर वाढून जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले होते. खनिज तेलाचा दर सर्वसाधारणपणे बुधवारी सात टक्क्यांनी वाढून 108.8 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेला होता. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी सामोपचाराची भाषा केली होती. आखतातील खाडी मुक्त झाली नाही तरी अमेरिका युद्ध गुंडाळणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केल्यानंतर आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात खरेदीचे वातावरण होते. मात्र नेहमीप्रमाणे ट्रम्प यांनी पूर्वीच्या वक्तव्याच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर जागतिक खनिज तेल बाजारात मागणी वाढून खनिज तेलाचे दर वाढले. स्पॉट मार्केटमध्ये खनिज तेलाचे दर वाढल्यानंतर लगेच देशातील आणि परदेशातील खनिज तेलाच्या वायदे बाजारातही खनिज तेलाचे दर वेगाने वाढले. त्यामुळे लघु ते मध्यम पल्ल्यांमध्ये खनिज तेलाचे दर सध्याच्या पातळीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. या घडामोडीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होणार आहे. कारण भारत खनिज तेलाच्या बाबतीत पूर्णतः परावलंबी आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर खनिज तेलाचे दर वाढल्यावर भारतात स्वयंपाकाचा गॅस आणि डिझेलच्या दरात काही प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. नागरिकांना जास्त त्रास होऊ नये म्हणून ही दरवाढ माफक असली तरी विविध राज्यातील निवडणुका संपल्यानंतर कंपन्यांच्या महसुलातील तूट भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात दर वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच झाले तर भारतीय स्थूल अर्थव्यवस्थेवर याचा लघु ते मध्यम पल्ल्यात नकारात्मक परिणाम होऊ शकतो असे आता गृहीत धरले जाऊ लागले आहे.