मुंबई – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अगोदरच्या घोषणेप्रमाणे प्रत्यक्ष व्यापारी युध्दाला आता सुरुवात केली आहे. याचा परिणाम अमेरिकेसह सर्व जगाला भोगाव लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेसह विविध देशाच्या शेअर बाजाराचे निर्देशांक घसरत आहेत. त्याचबरोबर अशा परिस्थितीत विविध देशाकडून खनिज तेलाची मागणी कमी होण्याची शक्यता असल्यामुळे मंगळवारी खनिज तेलाच्या दरात घट झाली. याचा अप्रत्यक्षरीत्या फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होण्याची शक्यता आहे. मंगळवारी शेअर बाजाराचे निर्देशांक घसरत असल्यामुळे आणि परदेशी गुंतवणूक भारतातून परत जात असल्यामुळे भारतीय रुपयावर अपेक्षेप्रमाणे परिणाम झाला होता. मात्र भारतीय रिझर्व बँकेने बराच हस्तक्षेप केल्यानंतर रुपयाच्या मूल्याची घसरण काही प्रमाणात कमी झाली. शेवटी रुपयाचा भाव कालच्या तुलनेत दोन पैशांनी वाढून 87 रुपये 30 पैसे प्रति डॉलर या पातळीवर स्थिरावला. दरम्यान या घटनाक्रमामुळे खनिज तेलाच्या किमती मात्र मंगळवारी दीड टक्क्यांनी कोसळून 70 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेल्या. या किमती मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे रुपयाला आधार मिळाला असल्याचे बर्याच ब्रोकर्सनी बोलून दाखविले. परदेशी गुंतवणूदाराकढून भारतीय बाजारात विक्री चालूच असून याचा परिणाम रुपयावर होत आहे असे सांगण्यात आले. अमेरिकेने रशियन तेल भारताने किंवा इतर देशांनी आयात करू नये यासाठी तेल कंपन्याबरोबरच तेल वाहून नेणार्या जहाजावरही बंदी घातली आहे. त्यामुळे भारताला रशियाचे तेल उपलब्ध होण्यात अडचणी होत आहेत. मात्र मुळातच जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमती कमी होणार असल्यामुळे भारताला खनिज तेल स्वस्तात मिळेल. अशा परिस्थितीत रुपया स्थिर होण्यास आणि महागाई कमी होण्यास मदत मिळेल असे सांगितले जाते.