नवी दिल्ली – नोव्हेंबर महिन्यात भारताने रशियाकडून केलेली खनिज तेलाची आयात चार टक्क्यांनी वाढवून 2.6 अब्ज युरो इतकी झाली आहे. हा पाच महिन्याचा उच्चांक आहे. दरम्यान भारताने ऑस्ट्रेलियाला शुद्ध इंधनाची निर्यात वाढविल्याची माहिती समोर आली आहे. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन इयर या संस्थेने उपलब्ध केलेल्या माहितीनुसार भारत अजूनही रशियाकडून खनिज तेल खरेदी करणारा जगातील दुसर्या क्रमांकाचा देश आहे ऑक्टोबर महिन्यात भारताने रशियाकडून 2.5 अब्ज युरोचे खनिज तेल खरेदी केले होते. रशियाच्या एकूण तेल विक्रीपैकी चीनने 47% भारताने 38% तुर्कस्तानने 7 % तर युरोपियन समुदायाने 6 % तेल खरेदी केले आहे. उपलब्ध माहितीनुसार भारत रशियाकडून डिसेंबरमध्ये खरेदी करणार असलेल्या तेलाची किंमतही जास्त असणार आहे. कारण अमेरिकेने रशियन तेल कंपन्यावर निर्बंध लावण्याअगोदर हे तेल रशियाकडून भारताकडे निघाले आहे. मात्र जानेवारीपासून ही खरेदी मंदावणार असल्याचे आकडेवारी बाहेर येईल. 22 ऑक्टोबर रोजी अमेरिकेने रशियाच्या दोन मोठ्या कंपन्यावर निर्बंध घातले आहेत. रशियाने तेल विकून युक्रेनबरोबर युद्ध करू नये म्हणून हे निर्बंध घातले असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे भारत आणि तुर्कस्तान शुद्ध केलेले तेल युरोपियन समुदाय आणि अमेरिकेलाही निर्यात करीत आहेत. मात्र आता हे सर्व थांबणार आहे.