मुंबई : अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम करणारी अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या हटके फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी ही अतरंगी लूक करुन फोटोशूट करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. अनेक लोक उर्फीला त्यामुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक करतात. दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्वीट शेअर करुन उर्फी जावेदवर टीका केली आहे. तसेच उर्फीला बेड्या ठोका, अशी मागणी या ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.
ट्वीटमध्ये ‘शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत. रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही, तात्काळ बेड्या ठोका हीला..एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.’ असे चित्रा वाघ यांनी केले आहे.
चित्रा वाघ यांच्या या ट्वीटने अनेकांचे लक्ष वेधले. या ट्वीटला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘बरोबर ताई अशा मुलींना काही वाटता की, नाही आम्हाला बघायला पण लाज वाटत आहे. ही रस्त्यावर उभी आहे.’ तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, ‘या बाईला रोखायला हव पण त्याचा पेक्षा फॅशन डिझायनर वर कठोर कारवाई करायची गरज आहे.’
अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीने काम केले आहे. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिचे वेगवेगळे लूक हे चर्चेत असतात.