प्रभात वृत्तसेवा पुणे – तिखट भाजी, सूप पासून आंबट-गोड सांबारमध्ये वापरल्या जाणारा शेवगा सध्या चांगलाच भाव खात आहे. राज्यातील शेवग्याचा हंगाम संपला असून परराज्यातून तुरळक स्वरुपात शेवगा मार्केट यार्डात दाखल होत आहे. थंडीची चाहूल लागताच सुप तसेच भाजी, सांबार तयार करण्यासाठी घरगुती ग्राहकांसह हॉटेलचालकांकडून जास्त मागणी होऊ लागल्याने शेवग्याचे भाव कडाडले आहेत. शहरात शेवग्याचा किलोचा भाव ६०० रुपयांवर पोहोचला असून गृहिणींकडून एक ते दोन शेंगाची दर्जानुसार ३० ते ६० रुपयांना खरेदी केली जात आहे.पुण्यातील बाजारात तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात तसेच स्थानिक भागातून शेवग्याची आवक होत असते. पावसाच्या तडाख्यामुळे राज्यातील शेवग्याच्या उत्पादनात घट झाली आहे. तामिळनाडूतील हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. सध्या गुजरात येथील शेवग्याचा हंगाम सुरू असून तेथून देशाच्या विविध भागात शेवगा विक्रीसाठी जात आहे. परिणामी, पुण्याच्या बाजारात शेवग्याची आवक कमी प्रमाणात होत आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत तो खूपच कमी असल्याने शेवग्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.एरवी बाजारात राज्यासह परराज्यातून चार ते पाच टन शेवग्याची आवक होते. यावेळी, त्यास किलोस दर्जानुसार १५० ते २०० रुपये दर मिळतो. मात्र, सध्या येथील आवक अवघ्या ५०० गोणींवर आली आहे. त्या तुलनेत मागणी अधिक असल्याने घाऊक बाजारात दर्जानुसार दर ३०० ते ४०० रुपये किलो पर्यंत पोहोचले आहे. घाऊक बाजारात शेवग्याच्या भावात वाढ झाल्याने किरकोळ बाजारात शेवग्याच्या शेंगाची ६०० रुपये किलो भावाने विक्री होत असल्याची माहिती किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी दिली.