प्रभात वृत्तसेवा पुणे – रेल्वे गाड्यांना अधीच गर्दी, त्यात विना तिकिट (फुकटे) प्रवास करणाऱ्यांमुळे रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढली आहे, अशा फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पथके नेमण्यात आली असून, मागील आठ महिन्यांत पुणे रेल्वे विभागात तीन लाखांहून अधिक फुकट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर, मध्य रेल्वेकडून पुण्यासह मुंबई, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर आदी विभागातून तब्बल २७ लाखांपेक्षा अधिक प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.फुकट्या प्रवाशांमुळे तिकिट काढून प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. विशेषत: लोकल रेल्वे गाड्यांसह एक्स्प्रेस व मेल गाड्यांमध्ये प्रवाशांना तिकीट असून, बसण्यासाठी वाद घालावे लागतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवास सुलभतेचा गैरफायदा घेत काही प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करीत आहेत. त्यामुळे रेल्वेच्या महसुलावर मोठा परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेता, विशेष तपासणी पथके, अचानक धाडसत्रे आणि स्थानकांवर तपासणी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले की, तिकीट काढूनच प्रवास करावा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. आगामी काळात तिकीट विरहीत प्रवास रोखण्यासाठी तपासणी आणखी कडक करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. मुंबई विभागात सर्वाधिक फुकटे… विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी न होता वाढत आहे. गेल्या आठ महिन्यांत सर्वाधिक फुकटे मुंबई विभागात सापडले आहेत. ११ लाख ३४ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून जवळपास ४८ कोटी रुपये दंड आकारला आहे. त्यापाठोपाठ भुसावळ येथे सात लाख प्रवाशांवर कारवाई करून ५९ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. पुणे विभागातून ३ लाख ७ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत १८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. सोलापूर विभागात सर्वात कमी दीड लाख तर नागपूर विभागात तीन लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.