Pune News | पुण्यात एका महिलेने 3 बीएचके फ्लॅटमध्ये तब्बल 350 मांजरी घरात पाळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हडपसर येथील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधून हा प्रकार उघडकीस आला आहे. मोठ्या संख्येने मांजरी ठेवल्यामुळे दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवासी हैराण झाले होते.
याप्रकरणी नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली. ज्यानंतर आरोग्य अधिकारी आणि पोलिसांचे पथक कारवाईसाठी या महिलेच्या घरी आले होते. त्यावेळी घरात असलेल्या दुर्गंधीमुळे आरोग्य अधिकारी चक्कर येऊन पडल्याची घटना घडली.
दरम्यान, या महिलेला यापूर्वी देखील पोलिसांनी आणि पालिकेकडून नोटीस देण्यात आली होती, तरी देखील तिने ऐकले नाही म्हणून अधिकारीच कारवाईसाठी गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील नवव्या मजल्यावर मागील ५ वर्षांपासुन तब्बल ३५० मांजरी पाळण्यात आल्या आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडे ५० मांजरी होत्या.
रहिवासी त्रस्त…
या मांजरांमुळे येणारा उग्र वास आणि ड्रेनेजमध्ये जाणार पाण्यामुळे सोसायटीमधील लोकांना प्रचंड त्रास होत आहे. तसेच दिवसभर या मांजराचा खूप जोरात रडण्याचा आवाज येतो. यामुळे आम्हाला खूप त्रास होतो असे नागरिकांचे म्हणणे आहे.
याप्रकरणी अखेर हडपसर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन फ्लॅटची पाहणी केली. त्यावेळी त्या फ्लॅटमध्ये ३५० मांजरी असल्याचे आढळून आले. सोसायटीमधील रहिवाशांची तक्रार लक्षात घेऊन मांजरी पाळणार्या संबधीत सदनिकाधारकांना ४८ तासात मांजरी हलविण्यात यावे, याबाबतची नोटीस पुणे महापालिकेच्या पशू संवर्धन अधिकाऱ्यांकडून बजाविण्यात आली आहे.
हेही वाचा :
विश्वविंड ते भेंडा अतिउच्च दाब मनोरे उभारणी प्रकरण; ‘प्रभात’च्या कणखर भूमिकेमुळे प्रशासन खडबडून जागे