Dhananjay Munde | राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या हत्या व खंडणीप्रकरणातील आरोपी हे मुंडे यांच्या जवळील असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्याविरोधात सोशल मीडियावरून सातत्याने आक्षेपार्ह टिप्पणी केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यातच आता मुंडे यांच्या आईबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरून धनंजय मुंडे यांच्या आईबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून सोशल मीडियावर मुंडे यांच्या आई रुख्मिणीबाई पंडितराव मुंडे यांच्या नावाचा वापर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू व माजी जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे यांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर अज्ञात यूट्यूबधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, एकीकडे भाजप आमदार सुरेश धस हे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहेत. त्यातच या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून विरोधकांकडून धस यांच्यावर टीका केली जात आहे.