सातारा -लॉकडाऊनमध्ये बाहेरगावी जाण्यासाठी सातारा पोलिसांचा आवश्यक असलेला पास मिळवून देण्याच्या नावाखाली तीनशे रुपये उकळल्याप्रकरणी सातारा शहरातील सोमवार पेठेतील महालक्ष्मी ऑनलाईन सेवा या दुकानातील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी महेश चंद्रकांत साळुंखे (रा. सदाशिव पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साळुंखे यांच्या मुलीला इस्लामपूर येथून सातारा येथे आणायचे होते. त्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यासाठी त्यांनी सोमवार पेठेतील महालक्ष्मी ई-सेवा केंद्रातून जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर अर्ज केला.
अर्ज भरून देण्यासाठी कोणतेही शुल्क न घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे यांनी आदेश असतानाही सेवा केंद्रातील अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडून तीनशे रुपये घेतले. तसेच त्यांचा अर्ज चुकीच्या पद्धतीने भरला. त्यामुळे त्यांच्या मुलीला परवानगी मिळाली नाही. त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात संबंधित केंद्रातील अनोळखी व्यक्तीविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.