रूपगंध : ससेहोलपट

भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. खरेतर भारतीय चाहत्यांना आपणच जिंकणार असे वाटत होते मात्र, त्यांचे डोके व मन वेगवेगळे विचार करत होते. जे काही घडले ते प्रत्येक भारतीयाच्या डोक्यात होते तेच घडले. या पराभवाला “लाजीरवाणा’ शब्दही कमी पडेल म्हणून या पराभवाचे वर्णन केवळ “ससेहोलपट’ याच एका शब्दाने करावे लागेल.
या सामन्यापूर्वी आपण आयपीएल स्पर्धेत खेळत होतो, त्यानंतर लगेचच काही दिवसांतच आपले खेळाडू पाढरे कपडे परिधान करत ओव्हलच्या नेटमध्ये सराव करू लागले. ही काय गल्लीतील मॅच होती का? जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख असलेल्या बीसीसीआयला साधे तीन दिवसांचे दोन सराव सामनेही आयोजित करता येऊ नयेत. सराव मिळाला असता तरच पांढरा चेंडू व लाल चेंडूतील फरक एका झटक्यात समजला असता. मात्र, जे काही करावया हवे ते आपण केलेच नाही आणि आता पराभवाची कारणे देण्यात धन्यता मानत आहोत.
खेळपट्टीचा अभ्यासच नाही
इंग्लंडमध्ये लहरी वातावरण असते हे काही रोहित शर्माला पहिल्यांदाच माहिती होते असे नाही. त्याने नाणेफेकीपूर्वी खेळपट्टी पाहिलीही होती. त्यानेच काय या मैदानावर धावांची रास ओतलेल्या व सध्या भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षकपद भूषवत असलेल्या राहुल द्रविड यांनाही ही खेळपट्टी ओळखता येऊ नये याचे आश्चर्य वाटते. कोणताही कर्णधार मायदेशात किंवा परदेशात मालिका खेळण्यासाठी किंवा एखादा सामना खेळण्यासाठी जातो तेव्हा तेथील सरावादरम्यान दररोज सामन्यासाठी तयार होत असलेली खेळपट्टी पाहतो. यावरून त्याला अंदाज येतो की, त्यावर गवत किती राखले आहे, ते किती बारीक केले जाणार आहे. त्यानंतर जेव्हा नाणेफेक होते, त्यापूर्वीही त्याने खेळपट्टी पाहिलेली असते. इतके सगळे होऊनही रोहित चुकला. याचे मुख्य कारण म्हणजे खेळपट्टीचा इतिहास तर माहीतच नाही; परंतु अभ्यासही करण्याची गरज नाही अशी मनोवृत्ती. याच मनोवृत्तीने या सामन्यात भारताचा घात केला.
संघनिवडीपासून चुका
रोहितने या सामन्यासाठी जेव्हा अंतिम संघ जाहीर केला तेव्हापासूनच आजी-माजी क्रिकेटपटू तसेच समालोचक, समीक्षक व सर्वसामान्य प्रेक्षकही आश्चर्य व्यक्त करत होते. ज्या श्रीकर भरतला प्रत्यक्ष सामना खेळण्याचा गेल्या दोनपेक्षा जास्त महिने अनुभवच नाही त्याला तुम्ही थेट ऑस्ट्रेलियासमोर उभे करत आहात. आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सकडे असतानाही त्याला कर्णधार हार्दिक पंड्याने एकाही सामन्यात खेळवले नव्हते. त्यामुळे त्याला मॅचप्रॅक्टीसच नव्हती. पांढऱ्या चेंडूवर टी-20 क्रिकेटचा सामना खेळणे वेगळे आणि लाल चेंडूवर पाच दिवसांचे कसोटी क्रिकेट खेळणे वेगळे हे त्याला आता लक्षात आले असेल. खरेतर त्यालाच नव्हे तर उमेश यादवलाही या सामन्यात का खेळवले गेले हे देखिल अनाकलनिय आहे.
इंग्लंडमध्ये खासकरून ओव्हलमध्ये जे वातावरण पाचही दिवस राहिले किंवा त्यापूर्वी सराव सत्रे सुरू असताना दिसत होते, त्यावरून तरी संघात चार वेगवान गोलंदाजांची गरजच नव्हती. ऑस्ट्रेलियाकडे तब्बल पाच डावखुरे फलंदाज असताना रवीचंद्रन अश्विनला संघात घेतले जात नाही यापेक्षा मोठा विनोद मी ऐकलेला नाही. श्रीकर भरतच्या जागी ईशान किशन व उमेश यादवच्या जागी अश्विन अत्यंत फिट बसतात हे इतरांना समजते ते रोहितला समजू नये. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने गेल्या 10 वर्षांत आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही अशी कारणे देत त्याच्याकडून नेतृत्व काढून घेतले गेले व ते रोहितकडे सोपवले. काटेरी मुकुटासाठी केवळ डोके बदलले गेले. तसेच भरत व उमेश यांना खापर फोडण्यासाठीच संघात घेतले गेले हे देखिल उघड आहे.
मानसिकताच नव्हती
मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवशी सुरू झालेली आयपीएल 29 मे या दिवशी संपली व त्यानंतर सातव्याच दिवशी आपण कसोटी सामना खेळत होतो. आयपीएल हे काही खरे क्रिकेट नव्हे त्याला फारतर करमणूक म्हणता येईल. पण कसोटीचे तसे नाही. ऑस्ट्रेलियाचा तो जगज्जेता संघ आज नसला तरीही कसोटीबाबत ते किती गंभीर असतात हे या सामन्याद्वारे निश्चितच दिसून आले. त्यातच त्यांना लगेचच इंग्लंडविरुद्ध प्रख्यात ऍशेस कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे ते या सामन्यात अत्यंत गांभीर्याने उतरले यात शंका नाही. भारतीय संघाबाबत बोलायचे तर त्यांची टी-20मधून बाहेर पडत कसोटी खेळण्याची मानसिकताच नव्हती. कर्णधार रोहित शर्मापासून दिग्गज फलंदाजांनी या कसोटीत ज्या प्रकारे फलंदाजी केली ती पाहता ते अद्याप टी-20च्या मोल्डमधून बाहेरच आलेले नाहीत. हल्ली संघासह सपोर्ट स्टाफ असतो त्यात एक मानसिक आरोग्य तज्ज्ञही असतो. पण त्याचीही मदत घ्यावी असे एकाही खेळाडूला वाटू नये.
दिशाहीन गोलंदाजी
महंमद शमी व महंमद सिराजची काही षटके व रवींद्र जडेजाची थोडीफार चमक असेच वर्णन या कसोटीत आपल्या गोलंदाजीचे करता येईल. शार्दुल ठाकूर व उमेश यादव यांच्या जागी अन्य कोणताही आयपीएल गाजवलेला गोलंदाज घेतला असता तरीही चालले असते. शमी व सिराज यांना स्विंग मिळाला नाही तर त्यांचा संघाला काहीही उपयोग नसतो हे अनेकदा दिसून आले आहे. उमेश व ठाकूर स्विंगसाठी ओळखले जात नाहीत तर त्यांच्याकडून कटर्सची अपेक्षा असते. या संपूर्ण सामन्याचे निरिक्षण केल्यावर एक गोष्ट लक्षात येते की, त्यांना दिशाच सापडत नव्हती. काही स्पेलचा अपवाद वगळता त्यांचे चेंडू ऑफ व मिडलवर पडतच नव्हते. त्यामुळे फलंदाजांना जखडून ठेवणेच त्यांना जमले नाही. जडेजाकडून कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी काय अपेक्षा करणार. तरीही त्याने खेळपट्टीचा पुरेपूर वापर करत गोलंदाजी केली मात्र, खेळपट्टीवर क्रॅकच जर तयार झाल्या नाहीत तर त्याला फिरकी तरी कशी मिळणार. पहिले तीन फलंदाज बाद झाल्यावर रोहितने जे क्षेत्ररक्षण लावले तेच उलट ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडले.
एकेरी व दुहेरी धावांवरच तर यशाचे इमले उभारतात. त्यांचे चौकार नियंत्रणात आणून त्यांच्यावर दडपण टाकू असा विचार रोहितने केला व तिथेच तो चुकला. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज त्यांच्या एकेरी धावांवर दडपण आणले गेल्यावर गोंधळतात व मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात व बाद होतात हे अनंत काळापासून आपण पाहात आहोत मग जे आपल्या लक्षात येते ते रोहितला लक्षात येऊ नये. क्षेत्ररक्षक फाइनलेगला लावला आहे मग गोलंदाज ऑफ स्टंपवर कसे काय गोलंदाजी करू शकतात. थर्डमॅनला खेळाडू उभा केल्यावर लेगसाइडला गोलंदाजी करणे हे कोणत्या प्रशिक्षकाने शिकवले. शमी काय किंवा सिराज व उमेश काय त्यांच्याकडे अचूक यॉर्कर्सच नव्हते. षटकातील चार चेंडू योग्य टाकले की प्रयोग करायला का जाता. ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅकग्राकडून किंवा त्याच्या गोलंदाजीचे रोकॉर्डिंग पाहून काहीतरी शिकायला हवे होते. त्याला संपूर्ण दिवसभर ऑफ स्टम्पवर चेंडू टाकायला लावले तरीही तो टाकत असे. आपल्या गोलंदाजांना कुठे चेंडू टाकायचा हेच समजत नव्हते.
बेभरवशी फलंदाजी
जगातील सर्वात भक्कम फलंदाजी भारतीय संघाकडे आहे असे आपण नव्हे तर परदेशी संघातील खेळाडूच सांगतात. मात्र जी भक्कमता कागदावर दिसते ती कसोटीत प्रत्यक्ष मैदानावर का दिसत नाही. कर्णधारपद हातात आल्यापासून रोहित शर्मा कुठेतरी हरवला आहे. विराट कोहलीही हल्ली धूमकेतू झालाय. त्याच्याकडून तर सर्वात जास्त अपेक्षा होत्या. कारण त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी संघातील अन्य फलंदाजांपेक्षा जास्त भरीव आहे. तरीही तो अपयशी ठरला. त्यात सर्वात विशेष वाटते ते चेतेश्वर पुजाराचे. त्याच्यावर कसोटी फलंदाज असा शिक्का बसल्यापासून त्याला मर्यादित षटकांच्या संघात कधीही घेतले जात नाही. त्यामुळेच आपल्याकडे जेव्हा आयपीएल सुरू झाली तेव्हा हा पठ्ठ्या इंग्लंडला काउंटी खेळण्यासाठी गेला.
तिथे त्याने चार चार शतके ठोकली. मग तो अनुभव या कसोटीत का दिसला नाही. त्यांच्याकडील आताच्या काउंटीत मोठी नावे असतील असे गोलंदाज खेळत नाहीत केवळ दुय्यम क्रमांकाचे म्हणजे आपल्या भाषेत सांगायचे तर गल्ली किंवा क्लब दर्जाचे गोलंदाज खेळतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्धच्या शतकांना तशी मान्यता शून्य असते. त्यामुळे या कसोटीत जितका विश्वास त्याच्यावर रोहित आणि कंपनीचा होता तेवढा द्रविडचा निश्चितच नसणार कारण कधीकाळी द्रविडही याच अनुभवातून गेला आहे.
असो, परभवाबद्दल किती आणि आता काय काय लिहिणार. यंदाचे विजेतेपद हातचे गेले आता तरी जागे व्हा आणि टिपीकल ऑस्ट्रेलियाच्या मानसिकतेतून कसोटी क्रिकेट खेळा म्हणजे किमान पुढील स्पर्धेचे विजेतेपद मिळेल अशी अपेक्षा तरी करता येइल.
अमित डोंगरे





