रूपगंध : हनी ट्रॅपचा विळखा

आयएसआयकडून अशा प्रकारचे हनी ट्रॅप लावले जाणे हा प्रकार पूर्वी अपवादात्मक घडायचा. आता तो एक प्रवाह बनला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने या ट्रॅपमध्ये भारतातील महत्त्वाच्या व्यक्तींना, लष्करी जवानांना, अधिकाऱ्यांना, शास्रज्ञांना अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या अटकेनंतर ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. त्यांनी नेमकी कोणती माहिती लीक केली आहे, त्यांच्यासोबत आणखी कोण-कोण यामध्ये अडकले आहे याबाबतचे सत्य समोर येणे आवश्यक आहे.
युद्धनीतीमध्ये आपले सामर्थ्य वाढवतानाच शत्रूच्या गोटात शिरून त्यांची रणनीती काय आहे हे समजून घेण्यासाठी गुप्तहेरांचा वापर हजारो वर्षांपासून केला जातो. आपला जीव धोक्यात घालून शत्रूच्या कटाची, हालचालींची बित्तंबातमी आपल्या राजाला, देशाला पोहोचवणारे गुप्तहेर हे वेशांतर करण्यासारख्या अनेक क्लृप्त्या लढवत असतात. पूर्वीच्या काळात राजा-महाराजांसाठी असे खबरे किंवा गुप्तहेर मोलाची भूमिका पार पाडत असत. आजही जगभरातील सर्वच देश अशा प्रकारच्या गुप्तहेरांच्या माध्यमातून हेरगिरी करत असतात. आधुनिक काळात त्याला नवे आयाम प्राप्त झाले आहेत.
विशेषतः माहिती-तंत्रज्ञानाचा विस्तार झाल्यापासून छुपे कॅमेरे बसवणे, उपग्रहांमार्फत हेरगिरी करणे, पेगासससारखे सॉफ्टवेअर वापरणे, विविध ऍप्सचा वापर करून माहिती चोरणे यांसारखे प्रकार राजरोसपणे घडताना दिसताहेत. याखेरीज आणखी एक प्रकार गेल्या काही वर्षांत वाढताना दिसत आहे तो म्हणजे हनी ट्रॅपचा. पहिल्या महायुद्धाच्या काळापासून सुरू झालेल्या हनी ट्रॅपने इंटरनेट तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा आधार अत्यंत खुबीने घेतला आहे.
पाकिस्तान आणि चीनसारखे देश या हनी ट्रॅपमध्ये भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तींना अडकवण्याचे प्रयत्न कसोशीने करताहेत. 2019 मध्ये भारताचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच सैन्यदलातील अधिकाऱ्यांना, जवानांना सोशल मीडियापासून लांब राहण्याचे निर्देशही दिले होते. त्यापूर्वी ब्राह्मोस मिसाईल सेंटर आणि डीआरडीओ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या नागपूरमधील एका प्रकल्पामध्ये कार्यरत असणाऱ्या नितेश अग्रवाल नावाच्या भारतीय शास्त्रज्ञाला अटक करण्यात आली होती. सदर शास्रज्ञ आयएसआयच्या हनी ट्रॅम्पमध्ये अडकल्याचे समोर आले होते. या जाळ्यात अडकून अग्रवालने ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या संदर्भातील हायटेक माहिती आयएसआयला दिल्याची माहिती उघड झाली होती.
हनी ट्रॅप अर्थात मधुजाल हा प्रकार नवा नाही. तथापि, आयएसआयकडून अशा प्रकारचे हनी ट्रॅप लावले जाणे हा प्रकार पूर्वी अपवादात्मक घडायचा. आता तो प्रवाह किंवा ट्रेंड बनला आहे. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये अच्युत प्रधान नावाचा बीएसएफ जवानही अशाच स्वरुपाच्या ऑपरेशनमध्ये पकडला गेला होता. फेसबुकवरून तो ज्या मैत्रिणीशी चॅटिंग करत होता त्या मैत्रिणीच्या फेसबुकच्या अकाउंटमध्ये 90 भारतीयांचा समावेश होता. त्यापैकी काही लष्करातील जवान किंवा अधिकारी होते. राजस्थानमधील अरुण मारवाह नामक हवाईदलाचा एक अधिकारीही हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे उघड झाले होते. त्याने अनेक महत्त्वाचे फोटोग्राफ आयएसआयला दिल्याचे कबूल केले होते. थोडक्यात, या घटना वारंवार घडताहेत.
सध्या याची चर्चा होण्याचे कारण म्हणजे पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना भारतातून गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून पुण्यातील संरक्षण विभागामधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक झाली आहे. कुरुलकर यांच्या ईमेल देवाण-घेवाणीत आढळलेले संशयास्पद ईमेल पाकिस्तानातील असल्याचे तपासातून पुढे आले आहे. तसेच त्यांच्या सोशल मीडियाद्वारे फोटो, व्हिडिओ आणि फाईल्स शेअर झाल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने कोर्टात सांगितले आहे. न्यायालयाने डॉ. कुरुलकर यांना 15 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून मोबाइल संच आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे.
डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी मागील 38 वर्षांहून अधिक काळाच्या सेवेत “डीआरडीओ’च्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केले आहे. “मिसाइलमॅन’ म्हणून ओळखले जाणारे, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबतही कुरुलकर यांनी काम केले होते. “डीआरडीओ’च्या प्रमुख क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपक आणि ग्राउंड सिस्टीम्सच्या निर्मितीत त्यांची अत्यंत मोलाची भूमिका होती. “मिशन शक्ती’ या उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपकाची निर्मिती त्यांच्याच नेतृत्वाखाली झाली. त्यांना निवृत्त होण्यासाठी फक्त 6 महिने बाकी असताना हे प्रकरण समोर आले आहे. ते पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील एका महिलेच्या संपर्कातही होते. डीआरडीओची व्हिजिलेंस व इंटीलिजेंस टीम अनेक महिन्यांपासून त्यांच्यांवर नजर ठेवून होती.
डीआरडीओ मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर एटीएसने त्यांना अटक केली. डॉ. कुरुलकरांवरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत किंवा त्यांनीही याबाबतची कबुली दिलेली नाही. परंतु आजवरचा इतिहास पाहता हनी ट्रॅपच्या प्रकरणात तपास यंत्रणांनी पकडलेल्या संशयितांवरील आरोप हे चुकीचे असल्याचे फारसे कधी घडलेले नाही. त्याचे कारणही तसे आहे. एखाद्या अधिकाऱ्याबाबत किंवा जवानाबाबत अशी शंका येऊ लागल्यानंतर त्याच्यावर अप्रत्यक्षपणाने पाळत ठेवली जाते. तसेच त्याचे सोशल मीडिया अकाउंट तपासले जाते. त्याच्या वर्तणुकीतील बदल, प्रवास, आर्थिक व्यवहार या सर्वांवर नजर ठेवली जाते. त्यातून मिळालेल्या माहितीची सुसूत्रता तपासली जाते. त्यानंतर अटकेचे पाऊल उचलले जाते. प्रदीप कुरुलकर सप्टेंबर 2022 पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात होते. त्यांच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद वाटल्याने जानेवारी महिन्यात त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला होता. त्यावेळी डीआरडीओच्या एका समितीकडे चौकशीसाठी हे प्रकरण सोपविण्यात आले होते.
एटीएसच्या आरोपांमध्ये तथ्य आहे असे मानल्यास वयाच्या साठीत पोहोचलेला हा माणूस आपल्या खात्यावर इतक्या मोठ्या कार्याची शिदोरी जमा असताना आणि निवृत्तीला काही महिने बाकी असताना हनी ट्रॅपमध्ये अडकला कसा? याबाबतच्या वृत्तांमध्ये म्हटल्यानुसार अश्लील व्हिडिओंसाठी त्यांनी हे कृत्य केले असेल? की हनी ट्रॅपमध्ये वापर केल्या जाणाऱ्या आकर्षक महिलांशी संबंध ठेवून त्यांचे ब्लॅकमेलिंग झाले आणि त्यातून त्यांनी ही माहिती दिली? की प्रचंड प्रमाणात पैसा घेऊन गोपनीय डेटा विकला? हे करत असताना आपण करत असलेले कृत्य हा देशद्रोह आहे, असा विचार मनात आला नसेल का? तसेच हे प्रकरण उघडकीस आल्यास आपण आजवर मिळवलेल्या सन्मानाला, आपल्या प्रतिमेला कधीही सांधला न जाणारा तडा जाईल याचीही कल्पना त्यांना आली नसेल? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांच्या तपासानंतर समोर येतील. कुरुलकरांवरील आरोप सिद्ध झाल्यास डीआरडीओसारख्या संस्थेसाठीही हा एक मोठा धक्का असेल, यात शंका नाही. डॉ. कुरुलकरांसारखी उच्चपदस्थ आणि संरक्षणाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारी व्यक्ती वाममार्गाने जात थेट देशाशी गद्दारी करताना आढळल्यास समाजाने आदर्श कुणाचा ठेवायचा असा प्रश्न उपस्थित होतो.
अशा प्रकारचा हनी ट्रॅप लावताना ज्या व्यक्तींना जाळ्यात ओढायचे आहे त्यांच्या इंटरनेट वापरण्याच्या सवयी जाणून घेतल्या जातात. त्यांची सायबर सायकॉलॉजी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. एवढेच नाही तर ज्या व्यक्ती सातत्याने पॉर्न साइट व्हिजिट करतात त्यातून त्यांच्या कमतरता किंवा वीक पॉइंट पाहिले जातात. त्यानंतर फेसबुक किंवा तत्सम सोशल माध्यमांतून संपर्क साधला जातो. यासाठी काही डमी महिला तयार केल्या जातात. अशा महिला आपले स्वतःचे मादक, अश्लील फोटोग्राफ पाठवून या व्यक्तींना भुलवतात. त्यांच्याबरोबर चॅटिंग करतात. या चॅटिंगचा वापर करून त्यांना हवी ती माहिती दिली नाही तर झालेला सर्व संवाद खुला करू अशा पद्धतीने धमकावून ब्लॅकमेलिंग थिअरीचा वापर करत ही माहिती मिळवली जाते. अशा प्रकारचे हनी ट्रॅप लावण्यासाठी पाकिस्तानने चक्क काही संस्थाच स्थापन केल्या आहेत. त्यामुळे भारताने अत्यंत सावध राहण्याची गरज आहे.
एक चांगली बाब म्हणजे या हनी ट्रॅपचा पर्दाफाश होत आहे. यासंदर्भात आपले संरक्षण खाते, गुप्तचर यंत्रणा, एटीएस हे चांगले काम करते आहे. असे असले तरी या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही दूरदर्शी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या लोकांना कडक शिक्षा देणे आवश्यक आहे. या गुन्हेगारांवर ऑफिशिअल सिक्रेट ऍक्टच्या अंतर्गत कारवाई न करता त्यांना देशद्रोह्याच्या कलमांतर्गत कडक शिक्षा दिली गेली पाहिजे. जेणेकरून कोणतीही व्यक्ती संरक्षण संबंधित माहिती शत्रूराष्ट्राला पुरवण्याचे दुःसाहस करणार नाही.
सहा प्रकारच्या व्यक्ती टार्गेट
* हनी ट्रॅपमध्ये साधारणतः सहा प्रकारच्या व्यक्तींना यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसते.
* लष्करी अधिकारी ः कोणत्याही दलातील कार्यरत अधिकारी त्यांना आमिषे दाखवली जातात आणि त्यांना हनी ट्रॅपमध्ये ओढले जाते.
* निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनाही गोवण्याचा प्रयत्न त्यात झालेला दिसतो.
* जे तरुण लष्करामध्ये जाण्यासाठी इच्छुक तरुणांनाही ट्रॅप केले जात आहे.
* या मधुजालामध्ये सामान्य माणसाला गुंतवले जाते आहे. यासाठी इथल्या गरिबी, बेकारीचा फायदा घेतला जातो. त्यांचा वापर शहरातील महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतींची रेकी किंवा टेहळणी करण्यासाठी केला जातो. या जागांचे स्थान, प्रवेश कसा करता येईल ही माहिती प्रामुख्याने दहशतवादी संघटनांकडून मिळवली जाते.
* इस्लामाबादेत असणाऱ्या भारतीय दुतावासातील कर्मचाऱ्यांनाही हनी ट्रॅप मध्ये फसवले जाते. काही वर्षांपुर्वी या दुतावासातील भाषा विभागातील कनिष्ठ दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये फसवल्याचे निदर्शनास आले होते.
* याखेरीज अलीकडील काळात तरुण वैज्ञानिक किंवा डीआरडीओसारख्या संरक्षण संशोधन संस्थांमधील शास्रज्ञांनाही हनी ट्रॅपमध्ये फसवले जात आहे. निशांत अगरवालला 2017-18 चे यंग इंडियन सायंटिस्ट हे पारितोषक मिळाले होते. अशा शास्रज्ञांना हेरून त्यांच्याकडून संरक्षणासंदर्भातील महत्त्वाची माहिती शत्रु राष्ट्रे काढून घेत असतात.
– श्रीकांत देवळे

