Odisha: भाजप सरकारचा शपथविधी 10 जूनला होणार; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितला मुहूर्त

भुवनेश्वर –ओडिशात भाजपची सत्ता येणार असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी सोमवारी केला. एवढेच नव्हे तर, त्या राज्यातील भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांनी १० जून हा मुहूर्तही नमूद केला.
ओडिशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या राज्यात ४ टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया होणार आहे. आता अखेरच्या टप्प्याचेच (१ जून) मतदान बाकी आहे. ते जवळ आल्याने बिजद आणि भाजप या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांकडून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. सत्तारूढ बिजदकडून सत्ता राखण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र, त्याला छेद देणारा प्रतिदावा हिमंता यांनी भाजपच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभांमध्ये केला.
ओडिशात पहिल्या ३ टप्प्यांमध्येच भाजप बहुमताच्या निकट पोहचला आहे. बहुमतासाठी अवघ्या काही जागांची आवश्यकता आहे. त्या जागा पक्ष अखेरच्या टप्प्यात मिळवेल, असे ते म्हणाले. ओडिशात विधानसभेच्या १४७, तर लोकसभेच्या २१ जागा आहेत. ओडिशासह संपूर्ण देशातील निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे.





