Odisha News : 15 वर्षांच्या मुलीला पेट्रोल टाकून पेटवले; ओडिशातील धक्कादायक घटना

भुवनेश्वर : ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पेट्रोल शिंपडून तिला पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी ही मुलगी तिच्या मैत्रीणीच्या घरी जात असताना बयाबार या गावात ही घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, अचानक तीन बदमाश तिच्या वाटेत आले आणि त्यांनी मुलीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. घटनेनंतर तिन्ही आरोपी पळून गेले. मुलगी गंभीररित्या भाजली होती आणि तिला भुवनेश्वरमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित मुलगी सुमारे ७० टक्के भाजली आहे. सध्या, पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पुरीचे एसपी पिनाक मिश्रा म्हणाले, काही मुलांनी गावातील एका निर्जन ठिकाणी एका मुलीचे शोषण केले. त्यांनी तिला ज्वलनशील पदार्थाने जाळण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच, बलांग पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि उच्च पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला, अल्पवयीन पीडितेला पिपली येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले होते परंतु आता तिला चांगल्या उपचारांसाठी एम्समध्ये रेफर करण्यात आले आहे.
ओडिशातील मुख्य विरोधी पक्ष बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. अशा घटना प्रशासनाच्या व्यवस्थेतील अपयशाचे संकेत देतात असे त्यांनी म्हटले आहे. राज्यात महिलांविरुद्ध अशा अकल्पनीय घटना आता जवळजवळ दररोज घडत आहेत अशी टीकाही पटनायक यांनी केली.





