ओतूर : मोबाइलचा अतिवापर आणि वाईट संगतीमुळे तरूण पिढी आई-वडिलांचा अनादर करताना दिसत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांनाच खरे दैवत मानावे आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करावे, असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार डॉ. वसंत हंकारे यांनी केले. ग्रामविकास मंडळ ओतूर संचलित सरस्वती विद्यालय उदापूरच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी ते बोलत होते. मुलींवर होणारे अत्याचार, बदललेली सामाजिक परिस्थिती आणि संस्कारांची गरज यावर डॉ. हंकारे यांनी सखोल विचार व्यक्त केले. आई-वडील मुलांच्या संगोपनासाठी अपार कष्ट घेतात, त्यामुळे मुलांनी कितीही मोठे झाले तरी त्यांना विसरू नये. संस्कार आणि चांगल्या सवयी या बाजारात विकत मिळत नसून त्या शाळेतच रुजवल्या जातात, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुधीर शिंदे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक रामदास भोर व सुनील ढोबळे उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय लष्करात लेफ्टनंट पदी नियुक्ती झाल्याबद्दल उदापूरचे सुपुत्र देवेन नामदेव शिंदे यांचा विद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सरपंच सचिन आंबडेकर, प्रभाकर शिंदे, तुळशिराम शिंदे, संजीव शिंदे, अनिल तांबे, नितीन घोडेकर यांसह ओतूर व उदापूर परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक प्रतीक अकोलकर यांनी प्रास्ताविक, साईनाथ भोर यांनी परिचय करून दिला आणि योगेश गाढवे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.