satara | रिमझिम पावसात छत्रपती शिवरायांना वंदन

सातारा, (प्रतिनिधी)- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा तिथीप्रमाणे साजरा होणारा साडेतीनशेवा शिवराज्याभिषेक दिन साताऱ्यात काल विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवरायांना अभिवादन करून गुरुवारी जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. रिमझिम पावसातही मिरवणुकीत सातारकरांचा उत्साह पाहायला मिळाला.
शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने दरवर्षी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. यंदा शिवराज्याभिषेकाचे साडेतीनशेवे वर्ष होते, त्यामुळे साताऱ्यात तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी येथील प्रतापसिंह हायस्कूलमधून विद्यार्थ्यांना सुमारे पाचशे वह्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ इतिहास संशोधक विनोद बाबर यांनी शिवनीती आणि शिवकाल याच्यावर व्याख्यान दिले.
तर तिसऱ्या दिवशी शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना सकाळी जलाभिषेक करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवराज्याभिषेक दिनाचे सक्रिय कार्यकर्ते उद्योजक संग्राम बर्गे, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते,
अमर बेंद्रे,पत्रकार संघाचे शहराध्यक्ष विनोद कुलकर्णी, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे तसेच बहुसंख्य शिवप्रेमी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सायंकाळी रिमझिम पावसात राजवाडा ते मोती चौक, शनिवार चौक (501 पाटी) मार्गे देवी चौक व तेथून पुन्हा राजवाडा अशी मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवरायांचा पुतळा हा दिव्यांनी सजवलेल्या रथामध्ये बसवण्यात आला होता.
शिवकालाची आठवण करून देणारे पारंपरिक वेषातील मावळे, शिंग तुतारीचा नाद यामुळे शिवराज्याभिषेक दिनाची मिरवणूक पावसातही लक्षवेधी ठरली.
मोती चौकात होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राज्याभिषेक उत्सव समितीच्यावतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.





