ओबीसी, महिला आरक्षणामुळे “मातब्बर’ अडचणीत

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षण सोडतीमध्ये आजी-माजी मातब्बर नगरसेवकांना मोठा फटका बसला आहे. भाजपचे माजी उपमहापौर केशव घोळवे, शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष लोंढे यांच्यावर आजच्या आरक्षण सोडतीमुळे गंडांतर आले आहे.
या मान्यवरांना पालिकेत प्रवेश करावयाचा झाल्यास प्रभाग बदलावा लागणार आहे. आरक्षण सोडतीमधून भाजपचे आणि राष्ट्रवादीचे अनेक मातब्बर नेते बचावले आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महापौर योगेश बहल यांना हक्काच्या संत तुकारामनगर प्रभागाऐवजी वल्लभनगर-कासारवाडी प्रभागातून पुन्हा मैदानात उतरावे लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आजच्या आरक्षणाचा फायदा काही माजी नगरसेवकांना होणार असल्याने त्यांचा महापालिकेतील प्रवेश सुकर होण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2022 साठीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.29) आरक्षणाची सोडत काढण्यात आली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून ओबीसी आणि महिलांसाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले. याप्रसंगी महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, उपायुक्त विठ्ठल जोशी आदी अधिकारी उपस्थित होते. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे,
माजी पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीच्या माजी सभापती सिमा सावळे, सामाजिक कार्यकर्ते सारंग कामतेकर आदी प्रमुख राजकीय मंडळींसह विविध पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेची निवडणूक तीन सदस्यीय पद्धतीने होणार असून 46 प्रभाग आहेत. नगरसेवक संख्या 139 जागा असून यामध्ये 70 महिला आणि 69 पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. त्यात अनुसूचित जाती (एससी) 11 पुरुष 11 महिला अशा एकुण 22, अनुसूचित जमाती (एसटी) 2 महिला 1 पुरुष अशा 3, ओबीसींसाठी 19 महिला 18 पुरुष अशा एकुण 37 जागा आहेत. तर खुल्या गटासाठी 38 महिला 39 पुरुष अशा 77 जागा असणार आहेत.
एससी आणि एसटीचे पुर्वी काढण्यात आलेले आरक्षण कायम ठेवून उर्वरित 114 जागांसाठी आज आरक्षण निश्चित करण्यात आले. आजच्या आरक्षण सोडतीचा फटका मनसे आणि शिवसेनेच्या काही प्रमुख नेत्यांना बसला आहे. तर काही प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक मान्यवरांना आपल्या सौभाग्यवतींचा प्रचार करावा लागणा आहे. आजच्या सोडतीमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या मान्यवरांचे प्रभाग मात्र सुरक्षित राहिले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महापौर योगेश बहल यांना संत तुकारामनगरचा प्रभाग सोडून कासारवाडीच्या प्रभाग क्रमांक 42 मधून लढावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे नाना काटे आणि भाजपचे शत्रुघ्न काटे यांना प्रभाग बदलावा लागेल किंवा आमने-सामने लढावे लागेल. राष्ट्रवादीचे प्रशांत शितोळे-अतुल शितोळे यांना पुन्हा आमने-सामने लढावे लागणार आहे. माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचीही अडचण झाली आहे. शिवसेनेचे माजी गटनेते राहूल कलाटे, मनसेचे माजी गटनेते सचिन चिखले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संतोष लोंढे यांच्यासह अनेक नगरसेवकांना आपल्या सौभाग्यवती निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे.
यांना पुन्हा सभागृहात येण्याची संधी
या आरक्षण सोडतीमुळे मावळत्या सभागृहातील महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, नितीन काळजे, राहुल जाधव, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, विलास मडिगेरी आदींना पुन्हा सभागृहात येण्याची संधी आहे.
यांची हुकली संधी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे, नगरसेवक मयूर कलाटे, जगदीश शेट्टी, उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, भाजप नगरसेवक शैलेश मोरे, शीतल शिंदे, शशिकांत कदम, भाजप नगरसेविका अश्विनी बोबडे, सुवर्णा बुर्डे, नम्रता लोंढे यांची संधी हुकणार आहे. या इच्छुकांना प्रभाग बदलून विजयी व्हावे लागेल. आरक्षण सोडतीमुळे शिवसेनेचे योगेश बाबर, अमित बाबर यांचीही अडचण झाली आहे.





