आरक्षणासाठी ओबीसींची वज्रमूठ! राज्यातील ओबीसी नेते बारामतीत एकवटणार

बारामती – ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणासाठी ओबीसी नेत्यांनी वज्रमूठ बांधली आहे . बारामतीत राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 29 जुलै रोजी हा मोर्चा निघणार असून राज्यातील ओबीसी नेते बारामती येथे एकवटणार असल्याची माहिती कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
ओबीसी चे राजकीय अतिरिक्त आरक्षण अवैध ठरल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे अतिरिक्त आरक्षण रद्द केले आहे. परिणामी याचं आरक्षणाच्या धर्तीवर 1995पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. परंतू आता येणाऱ्या काळात स्थानीक स्वराज्य संस्थामध्ये होणाऱ्या निवडणुकामध्ये ओबीसी प्रवर्ग रद्द करूनच निवडणुका होतील. त्यामुळे ओबीसीच्या राजकीय हक्कावर गदा येणार आहे.
त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या अटी आणि शर्ती पूर्ण करून 50% टक्याच्या आरक्षणाला संमती दर्शवली आहे. मात्र राज्य आणि केंद्रसरकार ओबीसीच्या आरक्षणाकडे गांभीर्याने पाहत नाही. म्हणून राज्य आणि केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी राज्यात एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची सुरवात बारामती पासून केली जाणार आहे. येत्या 29 जुलै ला बारामती मध्ये “एल्गार महामोर्चा” काढण्यात येणार आहे. या एल्गार महामोर्चा मध्ये ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या सर्व जातींचा समावेश असेल असे पत्रकार परिषदेत ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केले.
29 जुलै ला बारामती येथे होणाऱ्या महामोर्चासाठी संबंध राज्यातून ओबीसी समाजातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. या साठी पुणे जिल्ह्यात गावागावी घोंगडी बैठक, छोट्या मोठ्या सभा, फेसबुक, वॉट्सअप च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
बारामती मध्ये होणारा हा मोर्चा राजकीय पक्ष विरहीत मोर्चा असणार आहे. या मोर्चाला राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या ओबीसी नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यामध्ये महादेव जानकर,छगन भुजबळ, एकनाथ खडसे, नाना पटोले, विजय वडेट्टीवर, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, संजय राऊत, या प्रमुख व इतर नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.
मोर्चाच्या मागण्या
ओबीसी ची सामाजिक आर्थिक जात निहाय जनगणना तातडीने करण्यासाठी राज्य आणि केंद्रसरकार ने पावले उचलावीत. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या या तीन अटींची पूर्तता करावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागासलेपणाच्या प्रकाराबाबत आणि परिणामांबद्दल सद्यकालीन सखोल अनुभवाधिष्ठित चौकशी करण्यासाठी वाहून घेतलेला स्वतंत्र आयोग स्थापन करणे.
- आरक्षणाची अतिव्याप्ती होऊ नये म्हणून सदर आयोगाच्या शिफारशीनुसार स्थानिक संस्थांमध्ये करण्याच्या आरक्षण ठरवणे.
-
कोणत्याही स्थितीत एससी/एसटी आणि ओबीसींचं एकूण आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक होता कामा नये.
या अटींच्या बाहेर जाऊन सर्वोच्च न्यायालय ओबीसीना आरक्षण देणार नाही. त्यामुळेच न्यायालयाच्या निर्देशनुसार राज्य आणि केंद्रसरकार ने तातडीने पावले उचलून या मागण्या पूर्ण कराव्यात. अशी विनंती राज्य आणि केंद्र सरकारला या एल्गार महामोर्चा च्या वतीने करण्यात येणार आहे. ओबीसी नेत्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, ॲड. गुलाबराव गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, डॉ. अर्चना पाटील, समता परिषदेचे अनिल लडकत, संपतराव टकले, गणपत देवकाते, बापूराव सोलनकर, मच्छिंद्र टिंगरे, रवींद्र थोरात, वसंत घूले, चंद्रकांत वाघमोडे, दत्तात्रेय पुणेकर, विष्णुपंत चौधर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.





