मुंबई : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी आता राष्ट्रवादीतच आपले बळ दाखवले आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून त्यांनी अजित पवारांच्या भूमिकेलाच थेट विरोध केला आहे. महायुती सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यांच्या मराठा आरक्षणाविषयीच्या मागण्यासाठी जीआर काढला. तेव्हापासून महायुतीवर छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांनी या जीआरला आणि राज्य सरकारच्या आदेशाला विरोध केला. प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली. बॅकडोअरने मराठ्यांची ओबीसीतील प्रवेश सुरू असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणाविषयी नुकतेच एक वक्तव्य केले. त्याला छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणाविषयी मोठे वक्तव्य केले. ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावे, त्याला आमचे दुमत असण्याचे कारण नाही, अशी भूमिका मांडली. राजकारण करताना मी कधीही जात-पात किंवा नात्याचा विचार करत नाही. मी केवळ माणूस पाहतो आणि मदत करतो. काही लोक जातीचे वेड डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतात आणि समाजात तेढ निर्माण करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते असेही पवार म्हणाले. पण त्यांच्या या विधानावर भुजबळ मात्र चांगलेच नाराज झाल्याचे दिसले. त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याला त्यांचा विरोध दर्शवला. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावरून भुजबळ महायुतीतच नाही तर पक्षातही मतभेद असल्याचे समोर येत आहे.