ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाकेंनी घेतला मोठा निर्णय! सरकारची कोंडी करणार? तरुणांनाही केलं आवाहन; कारण काय?

Laxman Hake : नुकतीच ओबीसी समाजासाठी मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला ओबीसी समाजातील मंत्री आमदार उपस्थितीत होते. याशिवाय विरोधी पक्षातील काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना देखील बैठकीला आमंत्रित केलं होतं. पण ओबीसी समाजासाठी आंदोलनाची हाक देणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बैठकीला बोलावले नसल्यामुळे आता लक्ष्मण हाकेंनी मोठा निर्णय घेतला आहे.
५ अॅाक्टोबर म्हणजेच आज जेजुरीतून आंदोलनाची हाक देणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाचा मेळावा जेजुरीत पार पडणार आहे. या मेळाव्याला जत तालुक्याचे आमदार आणि भाजप नेते गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे हे दोघेही या मेळाव्यातून काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
त्यामुळे ओबीसींच्या लढ्यासाठी जेजुरीत येण्याचे आवाहान लक्ष्मण हाकेंनी केलं असून आंदोलनाची तळी उचलू या, असं आवाहनही त्यांनी तरुणांना केलं आहे. आता त्यांनी केलेल्या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या ओबीसी समाजातील नेत्यांच्या बैठकीनंतर मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देत जातीवादी लोकांचं ऐकू नये, अन्यथा परिणाम गंभीर होतील. असा इशारा दिला होता. त्यामुळे आता राज्यातील ओबीसी आरक्षणवरून राजकारण तापलं आहे.
या सगळ्यावर सरकार काय भूमिका घेणार आणि आज होणाऱ्या ओबीसी मेळाव्यातून लक्ष्मण हाके कोणावर टीकेची झोड उठवणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून ओबीसी समाज बांधव जेजुरीत दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा : नेतान्याहूंनी गाझा प्लॅननुसार पुढे जावे, हमासने जर…’ ; ट्रम्पकडून इस्रायल-हमास युद्धबंदीची मोठी घोषणा





