Oats: आजच्या धावपळीच्या जीवनात योग्य आहाराकडे लक्ष न दिल्याने वजन वाढण्याची समस्या तरुणांमध्ये वाढताना दिसते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामाबरोबरच हेल्दी डाएट घेणेही आवश्यक आहे. या संदर्भात नवा संशोधन अहवाल समोर आला असून त्यानुसार ‘ओव्हरनाईट ओट्स’ (रात्री भिजवलेले ओट्स) वजन कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी ठरतात. काय सांगतो नवा अभ्यास? अमेरिकेतील नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधनानुसार, साध्या ओट्सच्या तुलनेत रात्री भिजवून ठेवलेले ओट्स अधिक पौष्टिक ठरतात. यात ‘बीटाग्लूकॉन’ नावाचा फायबर असतो, जो पचनाची गती कमी करून पोट जास्त वेळ भरल्यासारखे ठेवतो. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि आरोग्याला हानिकारक अश्या तेलकट स्नॅक्सपासून बचाव होतो. ओव्हरनाईट ओट्स कसे बनवतात? ओट्स दूध, दही किंवा पाण्यात भिजवून फ्रिजमध्ये रातभर ठेवले जातात. सकाळी नाश्त्यात फळे किंवा ड्रायफ्रुट्स घालून हे खाल्ले जाऊ शकतात. अशा प्रकारे खाल्लेल्या ओट्समुळे पचन सुधारते. मेटाबॉलिझम सक्रिय राहतो आणि पोषण जास्त मिळते. शिजवलेले ओट्सही फायदेशीर दुसरा पर्याय म्हणजे शिजवलेले ओट्स. दूध किंवा पाण्यात ओट्स उकळून फळे, सुका मेवा घालून खाल्ले जातात. हिवाळ्यात हे शरीराला उब देतात आणि फायबरमुळे ब्लड शुगरही नियंत्रित राहतो. मात्र शिजवताना काही पोषक घटक कमी होऊ शकतात. तसेच जास्त प्रमाणात साखर, दूध किंवा ड्रायफ्रुट्स घातल्यास कॅलरी वाढण्याचा धोका असतो. संशोधनानुसार वजन कमी करायचे असल्यास ओव्हरनाईट ओट्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे कमी कॅलरीमध्ये भरपूर पोषण देतात, भूक नियंत्रणात ठेवतात आणि शरीरातील चरबी कमी करण्यात मदत करतात. मात्र शिजवलेले ओट्ससुद्धा योग्य प्रमाणात घेतले, तर तेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.