NZ W vs SA W New Zealand beat South Africa : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकातील सातव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा ६ विकेट्सने पराभव केला. तैजमिन ब्रिट्सने शतक झळकावून दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तत्पूर्वी, इंदूरच्या होळकर स्टेडियमवर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी २३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ४७.५ षटकांत हे लक्ष्य गाठले. तैजमिन ब्रिट्सने मोडला मंधानाचा विक्रम महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या सातव्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेची स्टार फलंदाज तैजमिन ब्रिट्सने न्यूझीलंडविरुद्ध शानदार कामगिरी केली. तिने फक्त ८७ चेंडूत १०१ धावा करत तिचे शतक पूर्ण केले. या शतकासह, ब्रिट्सने २०२५ मध्ये तिचे पाचवे शतक पूर्ण केले आणि महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके करणारी फलंदाज बनली. या कामगिरीसह, तिने स्मृती मंधानाचा विक्रम मोडला. दक्षिण आफ्रिकेकडून तैजमिन ब्रिट्स व्यतिरिक्त, सून लुसनेही शानदार फलंदाजी केली. तिने ११४ चेंडूंचा सामना करत ८३ धावा केल्या. संघ जिंकेपर्यंत ती मैदानावर राहिली. या सामन्यात तिने न्यूझीलंडविरुद्ध ९ चौकार आणि १ षटकार मारला. एकूणच, दोघींनीही न्यूझीलंडने दिलेल्या एकूण धावसंख्येचा पाठलाग केला. याशिवाय, कर्णधार लॉरा वोल्वार्डने १४ आणि मॅरिझॅने कॅपनेही १४ धावा केल्या. न्यूझीलंडकडून अमेलिया केरने २ बळी घेतले. तर, ली ताहुहू आणि जेस केरने प्रत्येकी १ बळी घेतला. हेही वाचा – NZ W vs SA W : मॅरिझॅन कॅपने गाठला ऐतिहासिक टप्पा, वनडे क्रिकेटमध्ये रचला नवा विक्रम! न्यूझीलंडचा डाव २३१ धावांत गडगडला – प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने एकूण २३१ धावा केल्या. सलामीवीर सुझी बेट्स शून्य धावांवर बाद झाली, तर जॉर्जिया प्लिमरने ६८ चेंडूत ३१ धावा केल्या. अमेलिया केरने ४२ चेंडूत २३ धावा केल्या. कर्णधार सोफी डोव्हाइनने तिच्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली, ९८ चेंडूत सर्वाधिक ८५ धावा केल्या. ब्रुक हॅलिडेनेही ३७ चेंडूत ४५ धावा केल्या. इतर फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत, ज्यामुळे न्यूझीलंडला अपेक्षित धावसंख्या गाठता आली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून नोनकुलुलेको म्लाबाने ४ बळी घेत गोलंदाजीत वर्चस्व गाजवले.