माथाडी, बांधकाम मजुरांना सामाजिक संघटनांचा दिलासा चऱ्होली – देशात करोनामुळे संचारबंदी, जमावबंदी कायदा लागू झाल्याने सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या असंख्य शेकडो लोकांचे हाताला मिळणारे काम बंद झाले आहे. परिणामी त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय लागत नसल्याने परप्रांतीय कुटुंबे आपल्या गावी जाण्यासाठी निघाल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. दिघी बोपखेल प्रभाग क्रमांक 4 मध्येसुद्धा कामगारांची मोठ्या प्रमाणावर वस्ती असलेला प्रभाग आहे. मात्र, येथील अनेक सामाजिक संघटनांनी हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबांना मदतीचा हात देत पुढे आल्याने या परिसरातील कामगारांना दोन वेळचे जेवण मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले आहे. मराठी उद्योजकांकडून 200 लोकांना जेवण हातावरचे पोट असलेल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूर कुटुंबासाठी दिघीतील मराठी उद्योजक कैलास बोरसे व त्यांच्या पत्नीने पुढाकार घेत घरी जेवण बनवून थेट कामगारांच्या दारात देण्याची सोय केली आहे. काटेवस्ती भागात रोजंदारीवर काम करणारे जवळपास 35 बांधकाम मजूर कुटुंबातील 70 ते 100 लोक वास्तव्यास असून त्यांना सध्या ना हाताला काम ना खिशात दाम अशी परिस्थिती प्रा. दत्तात्रय इंगळे यांनी सन्मित्र उद्योजक कैलास बोरसे यांनी माणुसकी व समाजभान जपत मदतीचा हात म्हणून संचारबंदी उठेपर्यंत या मजूर बांधवांना पोटभर जेवण देण्याचे कार्य हाती घेतले आहे. दिवसभर भोसरी, दिघी परिसरातील भुकेल्यांना शोधून त्यांची गाडी थेट त्यांच्याजवळ जाऊन जेवण देत आहे. दिघी खान्देश एकता मंडळतर्फे अन्नदान सामाजिक बांधिलकी जपत खान्देश एकता मंडळाच्या सहकार्याने अन्नदान उपक्रम सुरू करण्यात आला. हा उपक्रम जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत रोज सकाळी व संध्याकाळी चालू रहणार आहे. या वेळी खान्देश एकता मंडळाचे कैलास बोरसे, अनिल पवार, पुंडलिक सैंदाने, आनंद सूर्यवंशी कार्यरत आहेत. स्नेहछायातर्फे पालावरच्या मुलांसाठी अन्नछत्र दिघीतील जीवनविद्या परिवर्तन ट्रस्ट संचालित स्नेह छायाकडून परिसरातील पालावर राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना व मुलांना सकाळचा चहा, नाष्टा व जेवण देण्यात येत आहे. लोकसहभागामधून अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. 150 कामगारांच्या पोटाची भूक शमविण्याचे कार्य या उपक्रमातून स्नेहछायाचे संचालक प्रा. दत्तात्रय इंगळे करीत आहेत.