नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत रशियातील नागरिकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. रशियन पर्यटकांसाठी ३० दिवसांचा ई-टुरिस्ट व्हिसा आणि ३० दिवसांचा ग्रुप टुरिस्ट व्हिसा मोफत देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या घोषणेमुळे भारतात येणाऱ्या रशियन नागरिकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. यावेळी बोलताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताला इंधन आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. या पत्रकार परिषदेत दोन्ही देशांनी दहशतवादाविरुद्धची भागीदारी अधिक मजबूत करण्यावरही जोर दिला. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात रशियन नागरिकांसाठी मोफत व्हिसाची घोषणा केली. ते म्हणाले, ‘या वर्षाच्या ऑक्टोबरमध्ये, लाखो भाविकांनी आंतरराष्ट्रीय बौद्ध मंचात भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे आशीर्वाद घेतले. मला आनंद आहे की आम्ही लवकरच रशियन नागरिकांसाठी ३० दिवसांचा ई-टुरिस्ट व्हिसा आणि ३० दिवसांचा ग्रुप टुरिस्ट व्हिसा मोफत सुरू करणार आहोत.’ मोदींनी पुढे म्हटले की, गेल्या आठ दशकांत जगात अनेक चढ-उतार आले, मानवता अनेक संकटातून गेली, पण या सगळ्या दरम्यान भारत-रशिया मैत्री एका ध्रुव ताऱ्याप्रमाणे कायम राहिली आहे. परस्पर आदर आणि गाढ विश्वासावर आधारित हे संबंध नेहमीच काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला दोन्ही देशांच्या प्रमुखांनी व्यापार आणि कृषी यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सामंजस्य करारांवर (MoUs) स्वाक्षरी केली. ‘इंधनाचा पुरवठा अखंड सुरू राहील’ – पुतिन अमेरिकेने रशियासोबत क्रूड ऑईलचा व्यापार बंद करण्याचा दबाव आणलेला असतानाही, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताला इंधनाचा ‘अखंड पुरवठा’ सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. पुतिन म्हणाले, ‘रशिया भारताच्या ऊर्जा वाढीसाठी आवश्यक असलेले क्रूड ऑईल, गॅस, कोळसा आणि प्रत्येक वस्तूचा एक विश्वसनीय पुरवठादार आहे. वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी इंधनाचा पुरवठा अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी आम्ही तयार आहोत.’ दहशतवादाविरुद्ध खांद्याला खांदा – संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि रशिया दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दीर्घकाळापासून खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला असो वा क्रोकस सिटी हॉलवरचा भ्याड हल्ला, या सर्व घटनांची मुळे एकच आहेत. दहशतवाद हा माणुसकीच्या मूल्यांवरचा थेट हल्ला आहे आणि त्याच्याविरुद्ध जागतिक ऐक्य हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे, असे भारताचे मत आहे.’ शस्त्रास्त्रांची मदत सुरूच – शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्याबाबत पुतिन यांनी महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, ‘गेल्या जवळपास ५० वर्षांपासून रशिया भारतीय लष्कराला शस्त्रास्त्रे पुरवण्यात आणि त्याचे आधुनिकीकरण करण्यात मदत करत आहे. यामध्ये हवाई संरक्षण दल, विमान वाहतूक किंवा नौदल यांचा समावेश आहे.’ पुतिन यांनी या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ‘एकूणच, आम्ही नुकत्याच पूर्ण केलेल्या चर्चेच्या निकालांवर आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की ही भेट आणि येथे झालेले करार भारत-रशियाच्या सामरिक भागीदारीला (Strategic Partnership) अधिक प्रोत्साहन देतील, ज्याचा फायदा आपल्या दोन्ही देशांना आणि भारत-रशियातील लोकांना होईल.’