करोनामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढणार

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची तयारी सुरू

पुणे – विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर निवडणुकीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रात मतदारांची गर्दी होऊ नये, यासाठी 500 ते 700 मतदारांमागे एक मतदान केंद्र उभारले जाणार आहे. तसेच मतदारांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येणार आहे. केंद्रांवर सॅनिटायझर आणि थर्मल गनद्वारे तापमान तपासले जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी दिली.

 

शिक्षक व पदवीधर निवडणुकीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राव बोलत होते. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी हे विभागीय आयुक्त आहेत. तर पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तर 12 नोडल अधिकारी नेमण्यात आले आहे.

 

करोनामुळे मतदान केंद्रांवर प्रवेश करतेवेळी घ्यावयाची दक्षता, सोशल डिस्टन्स आदींचे नियोजन करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी यापूर्वी 1200 मतदारांच्या मागे एक मतदान केंद्र असे प्रमाण होते. आता विभागात मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे.

पदवीधरसाठी सव्वापाच लाख मतदार

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत मिळून पदवीधरसाठी 5 लाख 25 हजार 856 मतदार आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी 1 लाख 18 हजार 556 मतदार आहेत. सध्यस्थितीत मतदान केंद्रांची संख्या 1,107 इतकी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.