‘या’ सरकारी कंपनीने केली डिव्हिडेंडची घोषणा, तुमच्याकडे आहे का शेअर?

NTPC Dividend: सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी NTPC च्या शेअर्समध्ये तुमची गुंतवणूक असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एनटीपीसीने डिव्हिडेंडची घोषणा केली आहे. कंपनीने भागधारकांना प्रत्येक शेअर मागे 2.50 रुपये अंतरिम डिव्हिडेंड देणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनीने भागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीखही जाहीर केली आहे.
डिव्हिडेंडची घोषणा करतानाच कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकालही जाहीर केले आहे. तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या निव्वळ नफ्यात 3.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या कंपनीच्या शेअर्सची किंमत 323.65 रुपये आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 3.13 लाख कोटी रुपये आहे.
कंपनीने माहिती देताना सांगितले की, कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या अंतरिम डिव्हिडेंड स्वरुपात 2.25 रुपये प्रति शेअर (10 रुपये प्रति शेअर फेस वॅल्यूवर) घोषित केले आहे. यासाठी एनटीपीसीकडून 31 जानेवारी 2025 रिकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. याआधी कंपनीने ऑक्टोबर 2024 मध्ये 2.50 रुपये प्रति शेअर डिव्हिडेंडची घोषणा केली होती व नोव्हेंबर 2024 मध्ये याचे वाटप केले होते.
दरम्यान, एनटीपीसीच्या डिसेंबर तिमाही निकालाबाबत सांगायचे तर कंपनीचा निव्वळ नफा 3.1 टक्के वाढून 4711.4 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत नफा 4571.9 कोटी रुपये होता. या तिमाहीत महसुलातही वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीतील 39,455 कोटी रुपयांच्या तुलनेत महसूल 4.8 टक्क्यांनी वाढून 41,352.3 कोटी रुपये झाला आहे.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)





